​सावंतवाडी : सिंधुदुर्गात पावसाची दडी; प्रमुख नद्यांची पाणी पातळी खालावली, हंगाम असाच राहिल्यास तीव्र पाणीटंचाईचे सावट

शेअर करा

सावंतवाडी,दि.१५ जुलै
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्यामुळे नदी, नाले आणि ओढ्यांमध्ये पुरेसा पाणीसाठा जमा झालेला नाही. दरवर्षी मुसळधार पावसाची नोंद होणाऱ्या कोकणात यंदा जुलै महिना अर्धा संपला तरी पावसाने ओढ दिल्याने परिस्थिती चिंताजनक बनू लागली आहे. जर पावसाचा हा हंगाम असाच कोरडा गेला, तर भविष्यात शेतीचे मोठे नुकसान आणि तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याचा धोका वर्तवला जात आहे.


​दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदूर्गनगरी यांच्याकडून १५ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत अहवालानुसार, जिल्ह्यातील प्रमुख नद्यांची पाणी पातळी त्यांच्या इशारा आणि धोका पातळीच्या अत्यंत खाली आहे. पावसाअभावी नद्यांचे प्रवाह मंदावले आहेत.


​नद्यांची सद्यस्थिती (दुपारी १२.०० वाजेपर्यंतची आकडेवारी):
तिलारी नदी: तिलारीवाडी येथील सद्य पातळी ३७.२६० मीटर असून ती धोका पातळीपेक्षा (४३.६०० मी.) बरीच खाली आहे.
तेरेखोल नदी: इन्सुली चेकपोस्ट पूल येथील पातळी अवघी २.२०० मीटर आहे, तर धोका पातळी ६.१६० मीटर आहे.
कर्ली नदी: कुडाळ (धाकोरा पूल) येथील पातळी ३.५०० मीटरवर असून धोका पातळी १०.९१० मीटर आहे.
गडनदी: कणकवली-वागदे येथील पातळी १४.२०० मीटर आहे, तर धोका पातळी २७.९२० मीटर आहे.
वाघोटन नदी: खारेपाटण पूल येथील पातळी केवळ ४.००० मीटर असून धोका पातळी १०.५०० मीटर आहे.
​हंगाम असाच राहिल्यास उद्भवणारे संभाव्य धोके:


​भातशेतीवर मोठे संकट: कोकणातील मुख्य पीक असलेल्या भातशेतीसाठी पाण्याची मोठी आवश्यकता असते. पाऊस नसल्यामुळे अनेक ठिकाणी भातलावणीची कामे खोळंबली असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
​पिण्याच्या पाण्याची टंचाई: नद्या-नाले कोरडे राहिल्याने भूजल पातळी वाढणार नाही, ज्यामुळे आगामी काळात विहिरी आणि कूपनलिका कोरड्या पडून तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊ शकते.
​पशुधनाचा प्रश्न: जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनू शकतो.
​या गंभीर परिस्थितीवर लघु पाटबंधारे विभाग, ओरोस सिंधुदूर्गनगरी यांच्या कार्यालयामार्फत बारीक लक्ष ठेवले जात असून, जिल्हा प्रशासनाला याचे दैनंदिन अहवाल सादर केले जात आहेत.
पाऊस नसल्याने जमिनी उमळल्या नाहीत, जमिनी उमळल्या तर पाणी जमिनीत जिरवा मोहिमेला यश येते,पण कडकडीत उन्हाळा असल्यासारखे नैसर्गिक वातावरण निर्माण होत आहे.

शेअर करा