सावंतवाडी : आंबोली परिसरातील कबूलयतदार शेतकऱ्यांसाठी ‘फार्मर आयडी’ची अट शिथिल करा: शशिकांत गावडे यांची मागणी

शेअर करा

​महसूल मंत्री बावनकुळे व पालकमंत्री नितेश राणे यांना दिले निवेदन; १२ तारखेला मुंबईत संयुक्त बैठकीचे आश्वासन

सावंतवाडी,दि.०३ ऑगस्ट
आंबोली, चौकूळ आणि गेळे भागातील कबूलयतदार जमिनींवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना भेडसावणारी ‘फार्मर आयडी’ची (Farmer ID) अट खास बाब म्हणून शिथिल करण्यात यावी, अशी जोरदार मागणी आंबोलीचे प्रमुख गावकर तथा आंबोली विकास सोसायटीचे चेअरमन श्री. शशिकांत सोनू गावडे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री श्री. नितेश राणे यांना कणकवली येथे प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर केले.


​या निवेदनाचा सकारात्मक विचार करत महसूल मंत्री बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या या मागणीवर नक्कीच योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आंबोली परिसरातील कबूलयतदार जमिनीचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी येत्या १२ तारखेला विशेष संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
​ही बैठक वनमंत्री श्री. गणेश नाईक, महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री श्री. नितेश राणे आणि स्थानिक आमदारांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून, यामध्ये सर्व संबंधित यंत्रणा एकत्र येऊन या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढतील, असे सांगण्यात आले.


​दरम्यान, आंबोली, चौकूळ व गेळे परिसरातील शेतकऱ्यांचा हा महत्त्वाचा प्रश्न लवकरात लवकर सुटावा यासाठी प्रशासकीय स्तरावर सर्वतोपरी पाठपुरावा केला जाईल, असे ग्वाही पालकमंत्री श्री. नितेश राणे यांनी यावेळी दिली.
​हे निवेदन देतेवेळी आंबोली विकास सोसायटीचे चेअरमन श्री. शशिकांत सोनू गावडे यांच्यासह सोसायटीचे संचालक श्री. महादेव गावडे, संचालक श्री. संतोष पालेकर व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा