सावंतवाडी : कबुलायदार गावकर जमिनीवरील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ‘फार्मर आयडी’ची अट शिथिल करा; संजू परब यांची महसूलमंत्र्यांकडे मागणी

शेअर करा

सावंतवाडी दि.२ ऑगस्ट
शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत लागू करण्यात आलेली ‘फार्मर आयडी’ची अट शिथिल करण्यात यावी आणि आंबोली, चौकुळ व गेळे परिसरातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा, या मागणीचे निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना कणकवली येथे दिले. यासंदर्भात आमदार दीपक केसरकर यांच्या पत्रासह सादर करण्यात आलेल्या निवेदनात मंत्र्यांच्या उपस्थितीत तातडीने बैठक आयोजित करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
​आंबोली, गेळे आणि चौकुळ परिसरातील शेतकरी वर्षानुवर्षे महाराष्ट्र शासनाच्या ‘कबुलायदार गावकर’ जमिनीवर पारंपरिक पद्धतीने शेती करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांनी या शेतकऱ्यांना ७/१२ च्या आधारे कर्जपुरवठा केलेला आहे. मात्र, शासनाने कर्जमुक्ती धोरणात ‘फार्मर आयडी’ची अट अनिवार्य केल्यामुळे स्थानिक निकषांनुसार परिसरातील सुमारे ९० टक्के शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरत आहेत.
​सन २०२५ मध्ये झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे येथील शेतकरी आधीच मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत कर्जमुक्ती योजनेचा लाभ न मिळाल्यास शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होतील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
​या जाचक अटीमुळे शेतकरी लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली, राज्याचे कृषीमंत्री आणि स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत तातडीने विशेष बैठकीचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी संजू परब यांनी केली.
​निवेदन सादर करताना माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, विनायक दळवी आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा