सावंतवाडी,दि.०३ ऑगस्ट
मळेवाड–शिरोडा मुख्य रस्त्यावरील आजगाव येथील वाघबीळ परिसरातील धोकादायक वळणावरील नादुरुस्त लोखंडी रेलिंगची अखेर दुरुस्ती करण्यात आली असून वाहनचालक व प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी मोठी दुर्घटना थोडक्यात टळली होती. पणजी–वेंगुर्ले मार्गावरील कदंबा बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे खोल दरीत कोसळण्यापासून वाचली होती. बसमध्ये सुमारे ४० प्रवासी प्रवास करत होते. चालकाने वेळेवर प्रसंगावधान राखल्याने सर्व प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले होते.
या ठिकाणी तीव्र वळण आणि रस्त्यालगत खोल दरी तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाढलेली झाडी झुडपे वाढल्याने आणि सुरक्षेसाठी उभारण्यात आलेले लोखंडी रेलिंग पूर्णपणे नादुरुस्त झाले होते. या घटनेबाबत प्रसारमाध्यमांनी आवाज उठवून सतत पाठपुरावा केला होता.ग्रामपंचायत,नागरिकांनी व वाहनचालकांकडूनही तातडीने दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती.
या पाठपुराव्याला अखेर यश आले असून संबंधित विभागाने लोखंडी रेलिंग दुरुस्ती पूर्ण केली आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार असून संबंधित विभागाने भविष्यात अशा धोकादायक ठिकाणांची नियमित देखभाल करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत
आहे.
मात्र संबंधित विभागाने अशा घटना घडू नये म्हणून निदान धोकादायक रस्त्यावरील खड्डे,झाडी झुडपे,प्रलंबित दुरुस्तीची कामे हाती घेऊन ती पूर्ण करण्याची गरज आहे.
सध्या सगळीकडे रस्त्याच्या बाजूने झाडी झुडपे वाढली असून ,या झाडी मुळे समोरील वाहन दिसत नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. संबंधित विभागाने या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देणे तेवढेच गरजेचे आहे.