विशाल परब यांची घोषणा; महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकातील शेकडो धावपटूंचा सहभाग
सावंतवाडी, दि.२ ऑगस्ट
आंबोलीच्या निसर्गरम्य वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ स्पर्धेला महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यांतील शेकडो धावपटूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सलग तिसऱ्या वर्षी पार पडलेल्या या स्पर्धेने क्रीडाप्रेमींचे विशेष लक्ष वेधून घेतले.आंबोलीची पर्यटनस्थळ म्हणून ओळख अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने या मान्सून मॅरेथॉनला आगामी वर्षापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी घोषणा भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी यावेळी केली.ही स्पर्धा सह्याद्री अॅडव्हेंचर अँड रेस्क्यू टीम, आंबोली–सांगेली, सायकलिंग असोसिएशन आणि विशाल सेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, सामाजिक कार्यकर्त्या वेदिका परब, पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक, प्रथेमेश सावंत, माजी सरपंच सावित्री पालेकर , पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा, जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ, माजी पंचायत समिती सदस्य बाबल आल्मेडा शिवसेना तालुखा प्रमुख दिनेश गावडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कोकणातील ग्रामीण भागातील धावपटूंना आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. धुक्याने वेढलेल्या आंबोलीत रिमझिम पावसाच्या साक्षीने झालेल्या या स्पर्धेत महिला स्पर्धकांचाही उल्लेखनीय सहभाग होता.२१ किलोमीटर खुला पुरुष गटात चैतन्य रूपनार याने १ तास ८ मिनिटे ५७ सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला. अभिषेक कमान्णा देवकाते (१:०९:३१) याने द्वितीय, तर अनंत गावंकर (१:१०:२७) याने तृतीय क्रमांक मिळविला.२१ किलोमीटर खुला महिला गटात साक्षी सुभाष पवार हिने १ तास ३० मिनिटे ३१ सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक मिळविला. ममता पाटील (१:३२:०७) हिने द्वितीय, तर रेश्मा पंधारे (१:४४:२८) हिने तृतीय क्रमांक पटकावला.
महिलांनी मोठ्या आत्मविश्वासाने स्पर्धेत सहभाग नोंदवल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्या वेदिका परब यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. महिला सक्षमीकरण आणि आरोग्यदायी जीवनशैलीला चालना देण्यासाठी अशा स्पर्धांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.सुयोग्य नियोजन, स्वयंसेवकांचे योगदान आणि सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या प्रभावी व्यवस्थेमुळे स्पर्धकांनी आयोजकांचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे आंबोलीतील क्रीडा पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक व्यावसायिकांनाही निश्चितच लाभ होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.