सभापती सुष्मिता जाधव यांचा सत्कार; विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर
सावंतवाडी,दि.२ जुलै
महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या सावंतवाडी शाखेने आपल्या न्याय मागण्यासाठी नुकतीच सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती सुष्मिता जाधव यांची भेट घेतली. सभापतीपदी निवड झाल्याबद्दल सुरुवातीला संघटनेने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला. त्यानंतर संघटनेने आपल्या न्याय मागण्यांचे निवेदन सादर केले.
संघटनेचे सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकारी यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती मिळणेबाबत संघटनेने निवेदन दिले. सभापतींनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देत शक्य तेवढ्या लवकर मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले.
यापूर्वी संबंधित खाते प्रमुखांना दोन वेळा खालील मागण्यांबाबत निवेदने दिली होती, त्याविषयी काय पूर्तता झाली, याविषयी संघटनेने मागणी केली.तालुकास्तरावरील पेन्शन अदालतबाबत. सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकारी यांची माहे एप्रिल २०२६ ते जून २०२६ पर्यंतची यादी मिळणेबाबत . माहे मे २६ ते जून २६ मधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रस्तावाबाबत तसेच त्यांच्या भविष्य निर्वाह प्रस्तावाबाबत केलेली कार्यवाही. वरिष्ठ वेतनश्रेणी, निवडश्रेणी प्राप्त कर्मचारी प्रस्ताव व केलेली कार्यवाही.
महाराष्ट्रदर्शन व स्वग्राम प्रवास बिले.
पेन्शन मंजुरी प्रस्ताव सहा महिने अगोदर होणेबाबत. सेवानिवृत्तांच्या ओळखपत्राबाबत. पेन्शन दरमहाच्या एक ते पाच तारीख पर्यंत होणेबाबत.
महत्त्वाची मागणी ३१ जुलैची काल्पनिक वेतन वाढ मिळणेबाबत निवेदन दिले.
यावेळी गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनासुद्धा निवेदन देण्यात आले. त्याचप्रमाणे वरील बाबींची पूर्तता व केलेल्या कार्यवाही बाबत संघटनेस तालुका पातळीवरील सर्व अधिकाऱ्यांची पंधरा दिवसात एकत्रित भेट मिळावी व सदर भेटीबाबत अवगत करावे अशी मागणीही सभापतींकडे करण्यात आली.
सदर निवेदन देतेवेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गुंडू चव्हाण, सावंतवाडी तालुकाध्यक्ष लवू चव्हाण, तालुका प्रसिद्धीप्रमुख बाबली गवंडे, सदस्या सौ. सुप्रिया पालव, नेमळेकर सर, लवलेश शिरोडकर आदी पदाधिकारी आणि संघटनेचे सदस्य उपस्थित होते.