सावंतवाडी, दि. १७ जून
कोलगाव (मारुती मंदिर नजीक), सावंतवाडी येथील रहिवासी सुरेश अनंत आरोलकर (वय ६५) यांचे मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रात्री उशिरा सावंतवाडी येथील उपरलकर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुरेश आरोलकर हे रिक्षा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत असत. व्यवसाय सांभाळत त्यांनी आपली कलाजोपासनाही टिकवून ठेवली होती. सावंतवाडीत गणेशोत्सवा दरम्यान विविध मंडळांना हलते चित्ररथ (देखावे) तयार करून देण्यात त्यांना विशेष आवड होती. ते स्थानिक कळसुलकर इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, मोठा भाऊ श्रीकृष्ण उर्फ बाबी आरोलकर, लहान भाऊ सुनील आरोलकर, बहीण, पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने कोलगाव व सावंतवाडी परिसरातील त्यांच्या मित्रपरिवारात, नातेवाईकांत आणि हितचिंतकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाची माहिती माजी नगरसेवक राजू मसुरकर यांनी दिली आहे.