​सावंतवाडीत खड्ड्यांमुळे अपघात; उपजिल्हा रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर संजय परांजपे संतप्त

शेअर करा

सावंतवाडी,दि.१६ जुलै

​सावंतवाडी शहर नागरिकांसाठी दिवसेंदिवस असुरक्षित होत चालले असून, प्रशासकीय दुर्लक्षामुळे येथील रस्ते आणि आरोग्य यंत्रणा पूर्णपणे ढासळली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया येथील खासकीलवाडा रहिवासी इंजिनिअर संजय परांजपे यांनी व्यक्त केली आहे. रस्त्यावरील खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या परांजपे यांना उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या वाईट अनुभवानंतर त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी जाहीर केली.
​खड्ड्यांमुळे अपघात, हाताचे हाड मोडले:
​सावंतवाडी शहरात सध्या जागोजागी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. काल बुधवारी सायंकाळी याच खड्ड्यांमुळे संजय परांजपे यांची मोटरसायकल घसरून (स्लिप होऊन) गंभीर अपघात झाला. या अपघातात त्यांच्या उजव्या हाताचे हाड मोडले, तर डोक्यालाही गंभीर दुखापत झाली.
​रुग्णालयातील ‘रेफर’ संस्कृतीवर प्रश्नचिन्ह:
​अपघातानंतर परांजपे यांना तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथे उपचारासाठी त्यांना तब्बल एक तास वाट पाहावी लागली. त्यानंतर त्यांच्या विनंतीवरून डोक्याला टाके घालून एक्स-रे काढण्यात आला. एक्स-रे रिपोर्ट आल्यानंतर तेथील अस्थिरोग तज्ज्ञ (ऑर्थोपेडिक) डॉ. अवधूत यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला (रेफर) दिला.
​”सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर रुग्णांवर उपचार करण्यासाठी आहेत की केवळ ‘रेफर टू जिल्हा रुग्णालय किंवा बांबोळी’ एवढेच काम करण्यासाठी आहेत?” असा सवाल परांजपे यांनी उपस्थित केला. जिल्हा रुग्णालयातही अशीच परिस्थिती असणार, हा विचार करून अखेर त्यांनी पुढील शस्त्रक्रियेसाठी एका खासगी रुग्णालयात दाखल होणे पसंत केले.
​लोकप्रतिनिधींमध्ये टक्केवारीचा वाद, जनता वाऱ्यावर:
​शहरातील राजकीय परिस्थितीवर बोट ठेवत परांजपे म्हणाले की, एकीकडे सावंतवाडी नगरपरिषदेतील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात टक्केवारीवरून जोरदार वाद सुरू आहेत, तर दुसरीकडे शहरातील सामान्य जनता मात्र मूलभूत हक्कांपासून वंचित आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे अपघातांना कारणीभूत ठरत असताना निवडून आलेले लोकप्रतिनिधी नक्की करतात तरी काय? असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
​दरम्यान, प्रशासकीय राजवटीच्या काळात मागील दोन वर्षांत ‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’च्या माध्यमातून सिमेंट काँक्रीटने शहरातील सर्व खड्डे बुजवण्यात आले होते, याचा आवर्जून उल्लेख करत परांजपे यांनी प्रतिष्ठानच्या कामाचे कौतुक केले.
​संजय परांजपे यांच्या अपघाताची माहिती मिळताच ‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’चे कार्यकर्ते रवी जाधव, लक्ष्मण कदम आणि रूपा मुद्राळे यांनी खासगी रुग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली व धीर दिला. परांजपे यांनी या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.

शेअर करा