सावंतवाडी: कुडाळात ‘कोमसाप’च्या ज्येष्ठ साहित्यिक सदस्यांचा सत्कार

शेअर करा

सावंतवाडी,दि.२० जुलै
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या (कोमसाप) कुडाळ शाखेच्या वतीने तालुक्यातील ज्येष्ठ साहित्यिक सदस्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक ना. बा. रणसिंग, रा. बा. खानोलकर, कृष्णा उर्फ दादा मसके आणि के. एल. फाटक यांचा समावेश आहे.
​’कोमसाप’ कुडाळ शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात शाखा अध्यक्ष प्रा. संतोष वालावलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके आणि तालुकाध्यक्ष प्रा. संतोष वालावलकर यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिकांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सुपारीचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले.
​सत्काराला उत्तर देताना साहित्यिक ना. बा. रणसिंग यांनी कुडाळ शाखेचे आभार मानले. “केवळ साहित्यिक लिहीत असले तरी अनेक विचारवंत असे आहेत जे लिहीत नाहीत, पण चांगल्या प्रकारे व्यक्त होतात. त्यांनादेखील आपण लक्षात ठेवले पाहिजे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, आपली ४८ पुस्तके प्रकाशित झाली असून लवकरच ५० पुस्तके प्रकाशित होतील, तो सोहळा कोमसापच्या व्यासपीठावर व्हावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी रा. बा. खानोलकर व के. एल. फाटक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
​कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संतोष वालावलकर यांनी केले, तर सर्व साहित्यिकांचा परिचय मंगेश मसके यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद पवार यांनी केले.
​या सभेला डॉ. दिपाली काजरेकर, स्नेहा फणसळकर, वृंदा कांबळी, स्वाती सावंत, सुरेश पवार, डॉ. एस. टी. आवटे, मनोहर सरमळकर, निलेश जोशी, हर्षवर्धन खानोलकर, शांतनू खानोलकर, साईप्रसाद वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.

शेअर करा