विद्यार्थ्यांच्या दशावतार सादरीकरणाने जिंकली ग्रामस्थांची मने; ८ हजार रुपयांचे बक्षीस देऊन कौतुकाची थाप
चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत कोनशीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; चार विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव
सावंतवाडी ,दि.२१ ऑक्टोंबर
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, कोनशी येथे शारदोत्सव भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री शारदादेवीचे आवाहन व पूजन, आरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद आणि विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमांनी उत्सवाची रंगत वाढवली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांसह दशावतार नाट्यप्रयोगाने उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांवर प्रसन्न होऊन कोनशी ग्रामस्थांनी त्यांना प्रोत्साहनपर ८ हजार रुपयांचे रोख बक्षीस देत कौतुकाची थाप दिली.
कार्यक्रमाची सुरुवात श्री शारदादेवीच्या आवाहन व पूजनाने झाली. त्यानंतर देवीची आरती व तीर्थप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. श्री माऊली देवी देवस्थान समिती, कोनशी यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.
शाळेतील विद्यार्थ्यांनी गायन, नृत्य, नाट्यप्रयोग आणि विविध सांस्कृतिक कलाविष्कार सादर करून आपल्या सुप्त कलागुणांचे दर्शन घडविले. विशेषतः विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या दशावतार नाट्यप्रयोगाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, सादरीकरणातील उत्साह आणि कलात्मक आविष्कार यांचे उपस्थितांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या कलागुणांना अधिक वाव मिळावा, या भावनेतून ग्रामस्थांनी एकत्रितपणे ८ हजार रुपयांचे रोख बक्षीस प्रदान केले.
सेवा संकल्प अभियानातील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव
जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग व पंचायत समिती, सावंतवाडीच्या शिक्षण विभागामार्फत ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ आयोजित तांबुळी केंद्रस्तरीय चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा निकाल २०२६ मध्ये कोनशी शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. या यशाबद्दल शारदोत्सवाच्या व्यासपीठावर विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
चित्रकला स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी :
- सानिका संतोष गवस — इयत्ता सातवी-प्रथम क्रमांक.
- तीर्था निलेश बर्वे — इयत्ता चौथी-तृतीय क्रमांक.
वक्तृत्व स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी :
- वेदांत निलेश बर्वे — इयत्ता सातवी- प्रथम क्रमांक.
- अथर्व धनंजय जोशी — इयत्ता दुसरी- द्वितीय क्रमांक.
- तीर्था निलेश बर्वे — इयत्ता चौथी- प्रथम क्रमांक.
या विद्यार्थ्यांच्या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांना नवी ऊर्जा मिळाली आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे उपस्थितांनी कौतुक केले.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री. अयप्पा हिरेमठ (केंद्रप्रमुख, तुळस) उपस्थित होते. यावेळी कोनशीच्या सरपंच सौ. साधना शेट्ये, उपसरपंच श्री. अर्जुन सावंत, पोलीस पाटील सौ. नम्रता कोनशीकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सौरभ सिध्दये व उपाध्यक्ष श्री. सिध्देश गवस, ग्रामपंचायत सदस्य सौ. दिपाली गवस, मातृछाया प्रतिष्ठानचे श्री. बाबाजी सावंत आणि देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. गोरख गवस यांच्यासह ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. बाबुराव पास्ते यांनी केले. सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक डॉ. राजेंद्र चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपशिक्षिका सौ. स्वाती देसाई यांनी मानले.
भक्ती, संस्कृती, कला आणि शैक्षणिक गुणवत्तेचा सुंदर संगम घडविणारा कोनशी शाळेचा शारदोत्सव ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संस्मरणीय ठरला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा आणि शाळा व समाज यांच्यातील स्नेहबंध अधिक दृढ करणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला.