सावंतवाडी, दि. ६ जून
सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे (देऊळवाडी) येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त सिंहासनाधिष्ठित शिवरायांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करून अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भाजपा युवानेते विशाल प्रभाकर परब, सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनील निरवडेकर, आणि भाजपा युवामोर्चा अध्यक्ष हितेन नाईक उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ॲड. अनील निरवडेकर आणि विशाल परब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा इतिहास, स्वराज्य निर्मितीतील त्यांचे योगदान आणि आजच्या पिढीने त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज यावर सविस्तर भाष्य केले.
कार्यक्रमादरम्यान विशाल परब यांनी ग्रामस्थांना महत्त्वपूर्ण आश्वासन दिले. ते म्हणाले, “ज्याप्रमाणे ओटवणे येथील श्री देव रवळनाथ मंदिरासमोर सभामंडप उभारण्यासाठी सहकार्य केले, त्याचप्रमाणे या ठिकाणीही सभामंडप उभारण्यासाठी आपण पूर्ण सहकार्य करू.” त्यांच्या या घोषणेचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
या कार्यक्रमाला भाजपा सोशल मीडिया प्रमुख केतन आजगांवकर, माजी पोलिस पाटील तुकाराम गावकर, ओटवणे हायस्कूलचे मुख्याध्यापक होडावडेकर , चेतन गावकर तसेच या उपक्रमासाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून देणारे वैभव भानसे, धिरेंद्र म्हापसेकर, रामा गावकर, चंद्रकांत गावकर, विजय कविटकर, नारायण भानसे यांच्यासह परिसरातील शिवप्रेमी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, शिवरायांच्या विचारांचा जागर करण्यात आला.