सावंतवाडी,दि.०६ ऑगस्ट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सर्वत्र हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची रिपरिप सुरू असून सरासरी २६.८७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तालुकानिहाय पर्जन्यमानानुसार सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक ४६ मिमी, दोडामार्ग ४२ मिमी, कुडाळ ३७ मिमी, वैभववाडी २६ मिमी, मालवण २४ मिमी, वेंगुर्ला १८ मिमी, कणकवली १७ मिमी तर देवगड तालुक्यात ०५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील लघू व मध्यम पाटबंधारे प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. तिलारी तेरवण मोठ्या प्रकल्पात आज ७५ मिमी पावसासह ८६.९६ टक्के पाणीसाठा झाला असून तिलारी आंतरराज्य प्रकल्पात ८१.८५ टक्के पाणीसाठा झाला आहे. मध्यम प्रकल्पांपैकी कुडाळ येथील कोर्ले प्रकल्प १०० टक्के भरला असून अरुणा प्रकल्पात ८४.०२ टक्के व देवघर प्रकल्पात ७७.९७ टक्के पाणीसाठा झाला आहे.
तसेच जिल्ह्यातील २४ लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये सरासरी ९८ टक्के पाणीसाठा जमा झाला असून शिवडाव, नावाडे, तांबोळी, हरकुळ, आसरगाव, कोठावळे व घोटगे यांसह बहुतांश प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. धरणांमधून व वेस्ट वियरवरून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.