सावंतवाडी : पंचायत समिती सदस्यांच्या राज्यस्तरीय प्रशिक्षणाला पुण्यात प्रारंभ

शेअर करा

राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत नवनिर्वाचित सदस्यांसाठी क्षमता बांधणी कार्यक्रम; सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ल्यातील सदस्यांचा सहभाग.

सावंतवाडी ,दि.२४ जून

राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत सन २०२६-२७ या वर्षातील नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्यांसाठीच्या विशेष क्षमता बांधणी व प्रशिक्षण कार्यक्रमाला पुणे येथे सुरुवात झाली आहे. या राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला पंचायत समिती सदस्यांसह सभापती, उपसभापती सहभागी झालेत.

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत येणाऱ्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींची कार्यक्षमता वाढवणे, पंचायत राज व्यवस्थेचे सक्षमीकरण करणे आणि प्रशासकीय कामकाजाची सखोल माहिती देणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), लोकभवन आवार, बाणेर रोड, पुणे येथे हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून ते पूर्णपणे निवासी स्वरूपाचे आहे. ३ दिवसांच्या कालावधीत हे प्रशिक्षण संपन्न झाले असून या काळात सर्व लोकप्रतिनिधींना प्रशिक्षणस्थळीच निवास करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण प्रशिक्षणाला उपस्थिती लावल्यामुळे, आगामी काळात तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासकामांना अधिक गती, अचूक प्रशासकीय दिशा आणि लोककल्याणकारी योजनांना बळ मिळणार आहे.

शेअर करा