सावंतवाडी पंचायत समिती सभेत स्मार्ट मीटर सक्तीविरोधात तीव्र संताप

शेअर करा

भरमसाठ वीजबिलांमुळे ग्राहकांमध्ये असंतोष; तालुक्यात स्मार्ट मीटरची सक्ती थांबविण्याची सदस्यांची मागणी, शासनाशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सभापती सुष्मिता जाधव यांचे आश्वासन.

​सावंतवाडी,दि.१६ जुलै
स्मार्ट मीटरच्या सक्तीमुळे वीज ग्राहकांमध्ये निर्माण झालेला असंतोष आणि वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभाराचे पडसाद सावंतवाडी पंचायत समितीच्या मासिक सभेत उमटले. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना भरमसाठ बिले येत असल्याने सावंतवाडी तालुक्यात ही सक्ती केली जाऊ नये, अशी जोरदार मागणी सदस्यांनी केली. शासनाचे धोरण असल्याने वरिष्ठांच्या सल्ल्याने निर्णय घेतला जाईल असे आश्वासन सभापती सुष्मिता जाधव यांनी दिले.

सभापती सुष्मिता जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. याप्रसंगी उपसभापती गौरव मुळीक आणि गटविकास अधिकारी निलेश जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.
​स्मार्ट मीटरच्या सक्तीवरून वादळ:
सभेत स्मार्ट मीटरचा मुद्दा चांगलाच गाजला. सदस्य मायकल डिसोझा यांनी स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य ग्राहकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे सांगत, या सक्तीविरोधात पंचायत समितीने ठराव मंजूर करण्याची मागणी केली. जितेंद्र गावकर यांनी स्वतःचा अनुभव सांगत मीटरमुळे बिल वाढत असल्याचे स्पष्ट केले, तर शरद धाऊसकर यांनी स्मार्ट मीटर शेजारी जुना मीटरही ठेवण्याची मागणी केली. उपसभापती गौरव मुळीक यांनीही बिलांच्या अवास्तव रकमांवर तीव्र आक्षेप घेतला. मात्र स्मार्ट मिटर ला विरोध नाही असे सांगितले.
​यावर बोलताना गटविकास अधिकारी निलेश जाधव यांनी हे शासनाचे धोरण असल्याचे स्पष्ट केले. सभापती सुष्मिता जाधव यांनी थेट ठराव मंजूर करता येणार नसल्याचे सांगत, सदस्यांच्या सूचनांची नोंद घेऊन या विषयावर वरिष्ठ आणि स्थानिक आमदारांशी चर्चा केली जाईल, असे आश्वासन दिले.
​वीज वितरणच्या कारभारावरून संताप, ‘तक्रार वही’ ठेवण्याची सूचना:
तालुक्यातील धोकादायक वीज पोल आणि कर्मचाऱ्यांच्या उद्धट वर्तणुकीवरून सदस्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. कलबिंस्त आणि न्हावेली परिसरातील मोडकळीस आलेल्या वीज पोलकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप अनुक्रमे प्रथमेश सावंत आणि शरद धाऊसकर यांनी केला. वायरमन स्थानिक समस्यांची माहिती अभियंत्यांना देत नसल्याचा मुद्दा प्रशांत सुकी यांनी उपस्थित केला. यावर उपाय म्हणून प्रत्येक गावात ‘तक्रार वही’ ठेवण्यात यावी, अशी सूचना उपसभापती गौरव मुळीक यांनी मांडली.
​ग्राहक शांत राहतात म्हणून वीज कर्मचारी त्यांच्याशी उर्मट भाषेत बोलतात, असा आरोप जितेंद्र गावकर यांनी केला. यावर सहाय्यक अभियंता शैलेश राक्षे यांनी, अशा कर्मचाऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर वरिष्ठांमार्फत कारवाई केली जाईल, असे सांगितले. दरम्यान, वेंगुर्ले वीज वितरणचे अधिकारी बैठकीला उपस्थित राहत नसल्याने, वेंगुर्ल्याशी जोडलेली गावे सावंतवाडी विभागाला जोडण्यात यावीत, अशी मागणी गौरव मुळीक यांनी केली.
​आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पायाभूत सुविधा:
आरोग्य विभागाच्या आढाव्यादरम्यान, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि चालकांचे गेल्या ३ ते ७ महिन्यांचे वेतन थकीत असल्याकडे उपसभापती गौरव मुळीक यांनी लक्ष वेधले. सभापतींनी या विषयाचा तातडीने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. तसेच, प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी तातडीने सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.
​शेर्ले परिसरासाठी स्वतंत्र बोटीची मागणी:
तेरेखोल नदीला पूर आल्यानंतर शेर्ले परिसरात निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा मुद्दा सदस्य महेश धुरी यांनी उपस्थित केला. पूर परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शेर्ले परिसरात स्वतंत्र बोट उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
​या मासिक सभेला पंचायत समिती सदस्य अवनी राऊळ, प्रथमेश सावंत, प्रशांत सुकी, प्रणाली टिळवे, प्राजक्ता केळुसकर, धनश्री मराठे, शरद धाऊसकर, उदय पारिपत्ये, प्रियांका देसाई, उत्कर्षा गावकर, सदाशिव राणे यांच्यासह विविध विभागांचे शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा