​सावंतवाडी : विद्यार्थ्यांनी स्वप्ने पहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्य ठेवावे: पद्मश्री परशुराम गंगावणे

शेअर करा

सावंतवाडी दि.१ ऑगस्ट


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी अत्यंत हुशार आहेत. त्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवावे. सिंधुदुर्गची ओळख ‘अधिकाऱ्यांचा जिल्हा’ म्हणून व्हावी, यासाठी पालकांनी मुलांना योग्य संधी देऊन त्यांना करिअरच्या प्रवासात पूर्ण साथ दिली पाहिजे, असे प्रतिपादन पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी केले.
​कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग (तुळस) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.


​यावेळी सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील, संस्था अध्यक्ष दयानंद कुबल, सैनिक पतसंस्थेचे महाव्यवस्थापक सुनील राऊळ, स्टेपिंग ग्लोबल स्कूलचे संचालक अँड रूजूल पाटणकर, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अश्विनी लेले, पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रूपेश पाटील, पत्रकार आनंद धोंड, मुख्याध्यापक रामचंद्र घावरे,माहिती अधिकार महासंघाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सुशील चौगुले, सामाजिक कार्यकर्ते प्रसन्न उर्फ बाळू देसाई, पर्यावरण संस्थेच्या महिला जिल्हाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्त्या मानसी परब, डी. एस. जांभेकर आदी उपस्थित होते.
यावेळी पद्मश्री परशुराम गंगावणे म्हणाले, आपण घडलं पाहिजे. मोबाईल मधुन चांगलं घ्या. डिजिटल क्रांती झाली आहे. ए आय आले आहे त्यातून विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करायला हवा.मुलानी स्वप्न पहा,ते पुर्ण करण्यासाठी कष्ट करून सातत्य ठेवले तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी जिल्ह्याच्या गौरव निर्माण करतील. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल भविष्य घडवतील. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने यश संपादन करण्यासाठी वाटचाल करा.
तहसीलदार श्रीधर पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपला शैक्षणिक पाया भक्कम करण्याचे काम करा. शाळांतील विविध स्पर्धात सहभागी होवून अष्टपैलू बना. शिक्षण घेत असताना आपल्या गुणवत्तेला प्राधान्य द्यावे. शिक्षकांनी मुलांतील गुणवत्ता ओळखून त्याला मार्ग दाखवला पाहिजे. करिअरच्या संधी उपलब्ध आहेत फक्त तुम्ही आपले क्षेत्र निश्चित करा. विद्यार्थ्यांनी डिजिटल यंत्रणेचा वापर करून स्मार्ट बनण्यासाठी प्रयत्न करत रहा. अवांतर वाचनाची आवड निर्माण झाली तर स्पर्धा परीक्षा मध्ये फायदा होईल.
संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल म्हणाले, स्पर्धा परीक्षा साठी पालकांनी मानसिकता तयार करून अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करायचे त्यासाठी आम्ही निश्चित सहकार्य करू. विद्यार्थी प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी शिक्षक व पालक मेहनत घेतील. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी जगात नांव निर्माण करतील असा विश्वास वाटतो.

पोलिस उपनिरीक्षक माधुरी मुळीक म्हणाल्या, सिंधुदुर्ग जिल्हा साक्षर आहे. गुणवंत विद्यार्थी आहेत पण ते अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षा मध्ये भाग घेत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून चांगले अधिकारी घडावे असे मला वाटते. विद्यार्थ्यांनी चांगला मार्ग शोधला पाहिजे. नीट परीक्षा बाबत काही असलेतरी पालकांनी मुलांना या मध्ये चांगले सहभागी व्हा. सायबर सुरक्षा महत्त्वाची आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे त्यामुळे पालक व विद्यार्थी यांनी याबाबत साक्षर झाले पाहिजे. विद्यार्थ्यांवर पालकांनी लक्ष दिले पाहिजे. आपली मुले कुठे कचाट्यात सापडणार नाही अशी खबरदारी घेतली पाहिजे.
विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अश्विनी लेले म्हणाल्या, विद्यार्थी वर्षभर मेहनत घेऊन यशवंत होतात. विद्यार्थी करिअर बाबत जागरूक असतात. त्याच्या मागे पालकांनी राहायला पाहिजे. पालक व शिक्षकांनी यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव झाल्याने मुलं प्रेरणा घेऊन चांगला अभ्यास करण्यासाठी पुढाकार घेत असताना पहायला मिळतात. विद्यार्थ्यांनी आवडत्या क्षेत्रातील अभ्यासक्रम निवडा.पालकानी मुलांच्या स्वप्नांना प्राधान्य द्यावे. मुलांची क्षमता ओळखून त्यांच्या मागे रहा.
प्रा. रूपेश पाटील म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्राला आदर्श सहकार्य कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते दयानंद कुबल करीत आहेत त्यांचा प्रत्येक कार्यक्रम हा दर्जेदार असतो शिवाय त्यांच्या सामाजिक उपक्रमातून अनेकांना प्रेरणा मिळत असते. कोकण कला संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक आरोग्य महिला सक्षमीकरण रोजगार युवा विकास शेती आणि पर्यावरण अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले जात असून त्याचा सार्थ अभिमान वाटतो असेही प्राध्यापक पाटील यांनी नमूद केले. प्रास्ताविक प्रा. शिर्के यांनी तर कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्राध्यापक सचिन परुळकर यांनी केले. आभार प्रदर्शन प्रथमेश सावंत यांनी केले. दरम्यान या गुणगौरव सोहळ्यात तब्बल ३०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला तसेच शंभर टक्के निकाल लावणाऱ्या शाळांचे मुख्याध्यापक व त्यांचे प्रतिनिधी यांचाही गौरव करण्यात आला.

शेअर करा