पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे आदेश
सावंतवाडी,दि.०८ ऑगस्ट
आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत विशेष बैठकीत चर्चा
मुंबई: तिलारी प्रकल्पावर आधारित ‘वेंगुर्ला ते चिपी टप्पा-२ पाणीपुरवठा योजना’ आणि ‘तिलारी पाणीपुरवठा योजना सौर उर्जेवर कार्यान्वित करणे टप्पा-१’ या योजना शासनाच्या नाबार्ड योजनेअंतर्गत प्रस्तावित करण्यासाठी मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. सावंतवाडी विधानसभेचे आमदार तथा माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या मागणीनुसार ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री आदरणीय ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार या योजनांचे प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करण्याच्या अनुषंगाने या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
बैठकीस आमदार दीपक केसरकर यांच्यासह वित्त विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अप्पर मुख्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणे, पनवेल व सिंधुदुर्गचे वरिष्ठ अभियंता आणि नाबार्डचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष सर्वेक्षण करून येत्या १५ दिवसांत नाबार्ड योजनेअंतर्गत मंजुरीसाठी वित्त विभागाकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
यासोबतच सावंतवाडी तालुक्यातील मळगाव ब्राह्मणपाट, कुंभार्ली, सोनुर्ली, न्हावेली आणि सावंतवाडी रेल्वे स्टेशनला पाणीपुरवठा करण्यासाठीच्या प्रस्तावित योजनांवरही सकारात्मक चर्चा झाली. या सर्व गावांचा व रेल्वे स्टेशनचा समावेश ‘वेंगुर्ला ते चिपी टप्पा-२’ योजनेत करून १५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या प्रकल्पामुळे परिसरातील स्थानिक उद्योगधंदे, हॉटेल व्यावसायिक आणि पर्यटन व्यवसायाला मुबलक पाणी उपलब्ध होऊन पर्यटनाला मोठा वेग मिळणार आहे. भविष्यातील चिपी विमानतळ विस्तारीकरणासाठी तसेच सावंतवाडी रेल्वे टर्मिनससाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरेल. याशिवाय मार्च ते मे या कालावधीत किनारपट्टी भागातील गावांमध्ये जाणवणारी तीव्र पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.