सावंतवाडी, दि. ३१ मे
येथील विनायक पर्यटन सहकारी संस्थेच्या वतीने नागरिकांच्या सर्जनशीलतेला आणि कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय खुल्या ‘टाकाऊतून टिकाऊ’ (Best from Waste) स्पर्धेत कुणकेरी शाळा नं. ३ च्या उपक्रमशील शिक्षिका श्रीमती निता नितीन सावंत यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. पर्यावरणपूरक दृष्टिकोनाला चालना देण्याच्या उद्देशाने या आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
दिग्गजांची उपस्थिती आणि चुरशीची स्पर्धा
या स्पर्धेसाठी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तब्बल ३५ स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. सहभागी स्पर्धकांच्या उत्कृष्ट कलाकृतींमधून अंतिम विजेते निवडण्याचे कठीण काम यशवंतराव भोसले कॉलेजचे श्री. पोपकर आणि बांदेकर आर्ट कॉलेजचे श्री. अक्षय सावंत यांनी परीक्षक म्हणून चोख बजावले.
या स्पर्धेच्या वेळी सावंतवाडीच्या माजी नगराध्यक्षा श्रीमती अन्नपूर्णा कोरगावकर, उद्योजक श्री. सुरेश गवस, एसपीके कॉलेजचे प्राध्यापक श्री. सुधीर बुवा, मिलाग्रीज हायस्कूलच्या सेवानिवृत्त पर्यवेक्षिका श्रीमती मेघना राऊळ, जेष्ठ नागरिक संघाचे श्री. प्रकाश राऊळ, ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव श्री. राजेंद्र बिर्जे आणि विद्या बांदेकर, अध्यक्ष दिनानाथ बांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
निता सावंत यांच्या शिरपेचात आणखी एक तुरा:
प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या श्रीमती निता सावंत या एक अत्यंत उपक्रमशील शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी यापूर्वीही जिल्हा, राज्य, आंतरराज्यीय तसेच राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन करून अनेक पारितोषिके मिळवली आहेत. त्यांच्या या ताज्या यशामुळे त्यांच्यावर संपूर्ण जिल्ह्यातून आणि शैक्षणिक स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.