क्रिकेट अकॅडमीकडे जाणाऱ्या मार्गावरील काम रखडले; पालिकेकडून प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले, मात्र स्थानिकांकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी
सावंतवाडी, दि.१४ जुलै
शहरातील खासकीलवाडा भागात क्रिकेट अकॅडमीकडे जाणारा रस्ता गेला आठवडाभर मध्येच खोदून ठेवला आहे. यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे. पालिकेशी संपर्क साधला असता तेथील पुढील कामाबाबत प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले; मात्र एखादा अपघात झाल्यानंतर यंत्रणा जागी होणार आहे का? असा सवाल स्थानिकांना पडला आहे.
शहरातील अंतर्गत रस्त्यांची पूर्ण दुरावस्था झाली आहे. गॅस लाईन आणि पाणी योजनेसाठी दोन्ही बाजूने खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती म्हणजे केवळ मलमपट्टी ठरली आहे. काही भागात तर ही मलमपट्टीही झालेली नाही. खासकीलवाडा येथे शिल्पग्रामकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याकडून क्रिकेट अकॅडमीकडे वळणाऱ्या मार्गाबाबत ही अवस्था अत्यंत वाईट आहे. येथे पाईप टाकण्याचे काम गेल्या वर्षी करण्यात आले होते; मात्र हे चर केवळ माती टाकून बुजवण्यात आले. त्यामुळे हा रस्ता सध्या पूर्ण उखडलेला आहे. त्यात कहर म्हणजे अलीकडे आत वळणाऱ्या रस्त्याच्या एका बाजूला पाणी योजनेसाठी खोदाई करण्यात आली. त्याच्या दुसऱ्या बाजूला रस्ता खचला होता. त्यामुळे अपघाताची भीती होती. याबाबत पालिका प्रशासनाला सांगितल्यानंतर खचलेल्या भागात दगड-माती टाकण्यात आली. तेथून जाणे आणखी कठीण बनले.
गेल्या आठवड्यात रस्त्याच्या दुरावस्थेचा पालिका यंत्रणेने कळस गाठला. मुख्य रस्त्याकडून आत वळणाऱ्या भागात गटारावर टाकलेला स्लॅब खचल्याने तो काढण्यासाठी खोदाई करण्यात आली. याला आठवड्याहून अधिक काळ लोटला तरी अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता मधोमध खोदलेल्या स्थितीतच आहे. येथे पथदीपाचा पुरेसा प्रकाश पोहोचत नाही. एखादे वाहन थेट वळवल्यास गंभीर अपघाताचा धोका आहे. दुसऱ्या बाजूने थोडा मार्ग शिल्लक असला तरी त्यासमोर खडीचा मोठा ढीग उभा करून ठेवण्यात आला. त्यामुळे आत वाहन घालणे कसरतीचे ठरत आहे. येथे रहिवासी वसाहत मोठी आहे. शिवाय क्रिकेट अकॅडमीमुळे सायकलपासून मोटारीपर्यंतच्या वाहनांची वर्दळ असते. पालिका प्रशासन अपघाताची वाट पाहत आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. याबाबत पालिकेची बाजू जाणून घेण्यासाठी बांधकाम विभागाचे अधिकारी तुषार सरडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, “आरोग्य विभागाने गटार तुंबत असल्याने ही खोदाई केली आहे. त्याच्या दुरुस्तीबाबत आम्ही आवश्यक प्रक्रिया करत आहोत.”
प्रशासनाच्या संवेदना
हरवल्या कोठे?
सावंतवाडी पालिका प्रशासन नागरी सुविधांच्या बाबत काही वर्षांपूर्वी आदर्श मानले जायचे. एखादा स्थानिकांना भेडसावणारा प्रश्न किंवा अडचण असल्यास प्रशासन तातडीने त्यावर मार्ग काढत असे. अलीकडच्या काही वर्षांत प्रशासनाची ही संवेदना हरवल्याचे सावंतवाडीकर उघडपणे बोलत आहेत. मधोमध रस्ता खोदून त्यावर दुरुस्तीची आठवडा उलटला तरी न होणारी प्रक्रिया पाहता प्रशासनाच्या या कारभाराचा प्रत्यय येत आहे.