सावंतवाडी दि.५ ऑगस्ट
काल पासून राज्यात सुरू झालेला ॲलोपथी डॉक्टर्सचा बेमुदत संप हा राज्यातील सरकारच्या अन्यायकारक आणि बेकायदेशीर निर्णया विरोधात आहे, असे सावंतवाडी, वेंगुर्ले व कुडाळ आय एम ए संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ जयेंद्र परुळेकर यांनी सांगितले.
याबाबत डॉ जयेंद्र परुळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,राज्यात दोन लाख दहा हजार ॲलोपथी डॉक्टर्स आहेत आणि ते राज्यातील गेली अनेक दशके कार्यरत असलेल्या प्रतिष्ठित महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये (MMC) नोंदणीकृत (registered)
आहेत.
देशातील २८ राज्य आणि ८ केंद्रशासित प्रदेशांमध्ये कुठेही होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपथी औषधे वापरून प्रॅक्टिस करण्यास कायदेशीररीत्या कडक बंदी आहे .
असे असताना राज्यातील फडणवीस सरकारने एक वर्षाचा ॲलोपथी औषधशास्त्र (pharmacology) या विषयाचा जोड कोर्स करून होमिओपॅथी डॉक्टर्सना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये (MMC) रजिस्ट्रेशन करण्याची मुभा दिलेली आहे.(मुभा कसली?खोगीरभरती करण्याचा कुटील डाव आखलेला आहे)
या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात खटला चालू आहे, निकाल येणं प्रलंबित आहे.
असे असताना घिसाडघाई करून होमिओपॅथी डॉक्टरांना बेकायदेशीर रितीने एमएमसी रजिस्ट्रेशन करू देणे हा एकप्रकारे गुन्हा आहे.
राज्यातील सामान्य जनतेचे आरोग्य यामुळे धोक्यात येणार आहे.
माॅडर्न औषध शास्त्राचा वीक एण्ड कोर्स वर्षभर करून (वर्षातील १०४ दिवसांत)ॲलोपथी वैद्यकीय शास्त्र समजतं असा जावईशोधच जणू या सरकारने लावलेला आहे.
या निर्णयामागे एक मोठं अर्थकारण दडलेले आहे. राज्यात जवळपास ८६ खाजगी होमिओपॅथी मेडिकल कॉलेजस् आहेत. आज त्या काॅलेजस् मध्ये प्रतिवर्षी अनेक सीट्स रिकाम्या राहात आहेत. पण आता असा बेकायदेशीर निर्णय झाल्यामुळे होमिओपॅथी डॉक्टर्सना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये नोंदणी मिळू शकते या नुसत्या बातमीमुळेच या सर्व खाजगी होमिओपॅथी काॅलेजस् चे उखळ पांढरं होणार आहे. एकेक सीट पाच पाच दहा दहा लाख रुपयांना विकली जाणार आहे.
हा हजारो कोटी रुपयांचा गोरखधंदा सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळ करून फडणवीस सरकार मांडत आहे.
या बेकायदेशीर धंद्याविरोधातच राज्यातील ॲलोपथी डॉक्टर्स कामबंद आंदोलन करत आहेत.
यामुळे सामान्य रूग्णांना जो त्रास भोगावा लागत आहे त्या बद्दल सगळ्याच ॲलोपथी डॉक्टर्सच्या मनामध्ये व्यथा आहे पण या सगळ्या मनःस्तापाला आणि उद्वेगाला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे, असे डॉ जयेंद्र परुळेकर यांनी म्हटले आहे.