कणकवली पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा;दिल्लीत मेडिकल, बनावट नियुक्तीपत्रे व प्रशिक्षणाच्या नावाखाली आर्थिक गंडा घातल्याचा आरोप
सिंधुदुर्ग,दि.०६ ऑगस्ट
केंद्रीय शासकीय विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून पाच पालकांकडून तब्बल १ कोटी २० लाख रुपये उकळून फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय) तसेच मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज ऑफ इंडिया या विभागांच्या नावाने बनावट नियुक्तीपत्रे देत आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात विनिता विवेक मुंज (रा. कणकवली), सुबत्ता गिरीश माळी (रा. पुणे) आणि मनोज जैन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सेवानिवृत्त नेत्रचिकित्सक अधिकारी सुनील दामोदर धुरे (रा. कलमद, ता. कणकवली) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्याद दिली आहे.फिर्यादी यांच्या पत्नी सुनीता धुरे या फोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहायिका म्हणून कार्यरत असताना त्यांची ओळख विनिता मुंज हिच्याशी झाली होती. ऑक्टोबर २०२४ मध्ये विनिता मुंज हिने विविध शासकीय कार्यालयांमध्ये ओळखी असल्याचे सांगून फिर्यादींची दोन्ही मुले माधुरी व सिद्धेश यांना केंद्रीय शासकीय सेवेत नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले. प्रत्येक उमेदवारासाठी २४ लाख रुपये लागतील तसेच नियुक्ती आदेश मिळाल्याशिवाय पुढे पैसे देणार नसल्याची हमी दिली.विनिता मुंज हिने सांगितल्याप्रमाणे ११ डिसेंबर २०२४ रोजी सुबत्ता गिरीश माळी हिच्या आयसीआयसीआय बँकेतील खात्यावर आरटीजीएसद्वारे ६ लाख रुपये पाठविण्यात आले. त्यानंतर व्हॉट्सॲपवर अर्ज पाठवून तो भरून घेण्यात आला. पुढे १० जानेवारी २०२५ रोजी मनोज जैन याच्या सांगण्यावरून त्याच्याशी संबंधित खात्यावर आणखी ४ लाख रुपये आरटीजीएसद्वारे जमा करण्यात आले.
त्यानंतर मुलांना दिल्ली येथे वैद्यकीय तपासणीसाठी बोलावण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यावेळी दहा उमेदवारांसह विनिता मुंज, वनिता गोसावी आणि मधुरा मांजरेकर दिल्लीला गेले. तेथे सुबत्ता माळी व मनोज जैन यांनी भेट घेतल्याचा दावा करण्यात आला असून मेडिकलसाठी प्रत्येकी ५० हजार रुपये, असे एकूण ५ लाख रुपये स्वीकारण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर सर्व उमेदवारांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात नेऊन रक्ताचे नमुने, फिंगरप्रिंट आणि रेटिना तपासणी करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
मार्च २०२५ मध्ये फिर्यादींच्या मुलांना फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे नियुक्तीपत्र पोस्टाद्वारे प्राप्त झाले. मात्र,काही दिवसांनी त्या नियुक्तीत अडचण असल्याचे सांगून मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज ऑफ इंडियामध्ये नोकरी लावण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानुसार २१ मे २०२५ रोजी त्या मंत्रालयाचेही नियुक्तीपत्र पोस्टाने प्राप्त झाल्याचा उल्लेख फिर्यादीत आहे.
विनिता मुंज हिने वेळोवेळी फिर्यादींच्या घरी जाऊन रोख स्वरूपात ३८ लाख रुपये स्वीकारले. ही रक्कम पत्नीच्या भविष्य निर्वाह निधीतील १० लाख रुपये, जिल्हा परिषद आरोग्य पतसंस्था, ओरोस येथून घेतलेले ३० लाख रुपयांचे कर्ज तसेच आरडी व बचतीतील ८ लाख रुपये अशा विविध स्रोतांतून उभारण्यात आली होती. अशा प्रकारे फिर्यादींकडून एकूण ४८ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे .
त्यानंतर मुलांना चार ते पाच वेळा दिल्लीला पाठविण्यात आले. तसेच इतर पालकांच्या मुलांसमवेत दोन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठीही दिल्लीला पाठविण्यात आले. मात्र प्रत्यक्षात कोणतेही प्रशिक्षण झाले नाही आणि नोव्हेंबर २०२५ मध्ये सर्व मुले परत आली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
आरोपीकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर १४ फेब्रुवारी २०२६ रोजी १ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला, तर ४ जून २०२६ रोजी गौरव नावाच्या व्यक्तीमार्फत ५० हजार रुपये रोख आणि ५० हजार रुपये यूपीआयद्वारे देण्यात आले. अशा प्रकारे ४८ लाख रुपयांपैकी केवळ २ लाख रुपये परत मिळाले असून उर्वरित रक्कम अद्याप मिळालेली नाही, असा दावा करण्यात आला आहे. याच पद्धतीने प्रताप प्रभाकर दळवी यांच्याकडून २४ लाख रुपये, मनीषा मनोहर नाईक यांच्याकडून २४ लाख रुपये आणि संतोष बाबाजी मसके यांच्याकडून २४ लाख रुपये घेण्यात आले आहेत. पाच उमेदवारांना केंद्रीय शासकीय नोकरीचे आमिष दाखवून एकूण १ कोटी २० लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.