आरोपी साहिल धुरी अटकेत ; गुन्हा अन्वेशन पथकाची कारवाई
सिंधुदुर्ग,दि.१८ ऑक्टोंबर :
वर्दे खालची पालववाडी येथील महाविद्यालयीन युवती दामिनी किरण पालव ( वय 23) हिचा एकतर्फी प्रेम प्रकरणातून प्रेमवीर संशयित साईल विश्राम धुरी (वय 24रा. मठ , धुरीवाडा, ता. वेंगुर्ले) याने चाकूने भोसकून खून केल्याची घटना शनिवारी सायंकाळी वर्दे येथे उघडकीस आली आहे. खुनाची घटना घडल्यानंतर काहीवेळाने पोलीसांना कळविण्यात आले. त्यानंतर सिंधुदुर्ग पोलीसांनी तपासाचे चक्र फिरवत संशयित आरोपी साईल धुरी याला मध्यरात्री 12 वाजता बेड्या ठोकल्या. एकतर्फी प्रेमातून रागाच्या भरात चाकुने दामिनीच्या पोटावर, पायावर सपासप वार करत खुन केल्याची प्राथमिक कबुली संशयित साईल धुरी याने कबुली दिली आहे.
याबाबत वृत्त असे की,वर्दे-कडावल या रस्त्यापासून ७० मीटर अंतरावर चाकुने दामिनीचा खुन शनिवारी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास झाला. यावेळी दामिनी व संशयित आरोपी साईल यांच्यात वाद झाले. त्यानंतर दोघांमध्ये झटापट झाली. संशयित आरोपी साईल हा त्याठिकाणी स्प्लेंडर दुचाकी घेवून गेला होता. ज्यावेळी दामिनीवर चाकुने पोटावर व पायावर हल्ला केला. त्यावेळी मोठ्या ओरडण्याचा आवाज आल्याचा काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. दामिनीला नेहमीप्रमाणे महाविद्यालयातून आपल्या घरी जात होती. शनिवारी वडील नेमके बाहेर असल्यामुळे तिला नेण्यासाठी आले नव्हते. या संधीचा फायदा घेऊन साईलने तिचा खुन केला. तातडीने गावचे सरपंच , पोलीस पाटील यांनी पोलीसांना कळवल्यानंतर अप्पर पोलीस अधिक्षक नयोमी साटम यांनी घटनास्थळी भेट दिली.
वर्दे कडावल रस्त्यालगत असलेल्या ओहोळाजवळ दामिनीचा खुन झाला. त्याठिकाणी संशयित साईलने चाकुने हल्ला केला. त्यावेळी रक्ताच्या थारोळ्यात दामिनी कोसळली होती. त्याठिकाणी दामिनीचे कपडे रक्ताने माखले होते. क्रुरपणे संशयित साईलने दामिनीवर हल्ला केल्याचे चित्र घटनास्थळी दिसून आले. कारण ज्याठिकाणी दामिनी कोसळली होती त्याठिकाणी रक्ताचे सडे परसले होते. खुन केल्यानंतर संशयिताने दुचाकीवरुन पळ काढला होता. हा पळ काढताना एका प्रत्यक्षदर्शीने पाहिले होते. या प्रकरणातील मृत दामिनी हा हॉटेल मॅनेजमेंट हे शिक्षण कुडाळ येथील एका कॉलेज मध्ये घेत होती. त्याच कॉलेजमध्ये संशयित आरोपी हा शिकत होता. दोघांमध्ये प्राथमिक तपासात इन्स्टाग्राम मागील दोन वर्षांपासून ओळख असल्याचे पुढे आले आहे. दामीनीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या साईल याने मागील वर्षभरापूर्वी दामिनी ला प्रपोज केले होते , मात्र प्रेमसंबंधास दामिनी नकार दिला होता. आपल्या प्रेमाला प्रतिसाद देत नसल्याची भावना साईलच्या मनात निर्माण झाली त्यामुळे साईल हा काही दिवसांपासून दामिनीवर राग करत होता. अखेर शनिवारी याच रागातून साईलने दामिनीच्या पोटावर आणि पायावर धारदार चाकूने वार करत खून केला आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग पोलीसांनी तपासाचे चक्र फिरवत सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने संशयित आरोपी साईल धुरी याच्या मठ – धुरीवाडा येथील घरी छापा टाकला. साईल घरीच पोलीसांना रात्री 12 वाजता आढळून आल्याने त्याला ताब्यात घेत बेड्या ठोकल्या.
महाविद्यालयीन युवती दामिनी हिचा खून करण्यासाठी वापरलेल्या मोटरसायलच्या नंबरवरुन आरोपीच्या घरापर्यंत पोलीस पोहोचले.डिगस येथील एका दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये सदर मोटरसायकल दिसून आली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने मठ येथे आरोपी साईल याला ताब्यात घेतल्यानंतर खुनात वापरलेला धारदार चाकु , वर्दे येथे जाण्यासाठी गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल, मयत दामिनीचा मोबाईल, आरोपी साईलचा मोबाईल, आरोपीच्या खुनाच्यावेळी अंगावर घातलेले रक्ताने माखलेले कपडे यासह अन्य काही महत्वाच्या गुन्ह्यात वापरलेल्या गोष्टी पोलीसांनी ताब्यात घेतल्या आहेत.
वर्दे कडावरल रोडवर महाविद्यालयीन युवती दामिनी पालव हिचा खुन झाल्यानंतर तातडीने पोलीसांनी सहा पथके आरोपीच्या शोधासाठी तैनात करण्यात आली होती. जिल्ह्यात सतर्कता बाळगत नाकाबंदी करण्यात आली. संशयित आरोपी जिल्ह्याचा बाहेर पळून जावू नये म्हणून प्रथमत: प्रत्यक्षदर्शीनी सांगितलेल्या वर्णनानुसार स्प्लेंडर गाडी व अंगावर असलेल्या कपड्याच्या आधारावर शोध मोहिम पोलीसांनी राबवली. मात्र, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपास या आधारावर आरोपी पर्यंत पोलीस पोहोचले.
आई वडापाव घेऊन येऊ का?
दामिनी कॉलेज सुटल्यानंतर घराकडे येताना शेवटचं आईशी बोलली होती. आई वडापाव घेवून येवू का ? अशी विचारणा आपल्या आईला घराकडे येताना केली होती. तो फोन दामिनीच्या आयुष्यातील आईसाठीचा शेवटचा ठरला. हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभं राहण्याची तिची धडपड सुरू होती. येत्या दोन दिवसांत नोकरीच्या मुलाखतीसाठी ती मुंबईला जाणार होती, अशी माहिती समोर येत आहे.
शनिवारी सकाळी घरातून बाहेर पडताना तिने अनेक स्वप्न पाहिली होती. पण ती अशी उद्ध्वस्त होतील अशी पुसटशीही कल्पना तिला नव्हती. आईशी तिचं शेवटच फोनवर बोलणं ही झालं. मात्र, काही वेळातच तिचा मोबाईल बंद झाला आणि त्यानंतर तिचा दुदैवी खुन झाल्याची बातमी समोर आली.
मृत दामिनी पालव हिच्या खुन प्रकरणात जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस निरिक्षक विकास बडवे, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक प्रविण कोल्हे यांनी खुनाचा उलघडा केला. या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरिक्षक हनुमंत भोसले, उपपोलीस निरिक्षक अनिल हाडळ यांच्या पथकाने महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. मृत दामिनी हिच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे. तिचे वडील पेंटिंग व शेती व्यवसाय करतात. अचानक दामिनीच्या निधनाने कुटुंबियांना धक्का बसला आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.