सिंधुदुर्ग सहकारातील सुवर्ण “मनीष”पर्व…
सिंधुदुर्ग,दि.०१ ऑगस्ट
"नेतृत्वाची खरी ओळख पदावरून होत नाही, तर त्या पदाला दिलेल्या उंचीवरून होते." गेल्या साडेचार वर्षांत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा प्रवास पाहिला, तर ही उक्ती अक्षरशः खरी ठरते. आर्थिक शिस्त, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, शेतकरीहिताची धोरणे, महिला सक्षमीकरण, युवकांना संधी आणि सहकार क्षेत्रात नवा आत्मविश्वास निर्माण करत अध्यक्ष मनीष प्रकाश दळवी यांनी जिल्हा बँकेला केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम केले नाही, तर तिला राज्यातील अग्रगण्य जिल्हा बँकांच्या पंक्तीत मानाचे स्थान मिळवून दिले. त्यामुळे माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांतील हिऱ्याची केलेली पारख योग्य ठरली आहे. अध्यक्ष म्हणून मनीष दळवी यांनी गेल्या साडेचार वर्षात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांचा हा ४५ वा वाढदिवस केवळ शुभेच्छांचा दिवस नसून, सहकारातील एका यशस्वी नेतृत्वाचा मागोवा घेण्याची संधी आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण वाटचालीत १३ जानेवारी २०२२ हा दिवस महत्त्वाचा ठरला. कारण खा. नारायण राणे यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदासाठी वेंगुर्ले होडावडा येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आणि सहकारातील उत्तम जाण असलेल्या मनीष दळवी यांच्या नावाची निवड केली. त्या दिवशी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताना बँकेसमोर अनेक आर्थिक, प्रशासकीय आणि स्पर्धात्मक आव्हाने उभी होती. सहकार क्षेत्रात वाढती स्पर्धा, बदलते बँकिंग तंत्रज्ञान, शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या वाढत्या अपेक्षा तसेच नफाक्षमतेचे आव्हान अशा परिस्थितीत मनीष दळवी यांनी अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. अवघ्या साडेचार वर्षांच्या कालावधीत त्यांनी बँकेच्या कामकाजाला नवी दिशा, नवी गती आणि नवी ओळख मिळवून दिली. आज राज्यातील अग्रगण्य जिल्हा बँकांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे नाव आदराने घेतले जाते, हीच त्यांच्या नेतृत्वाची मोठी पावती मानली जाते.

अध्यक्षपद स्वीकारताना बँकेची आर्थिक स्थिती आणि आजची भक्कम स्थिती यातील फरक हा केवळ आकड्यांचा नाही, तर दूरदृष्टीचा आहे. नफाक्षमता, कर्जवाटप, वसुली, ठेवी, तंत्रज्ञान, ग्राहकाभिमुखता आणि नव्या योजनांच्या अंमलबजावणीत बँकेने उल्लेखनीय झेप घेतली आहे. जिल्ह्यातील सहकार चळवळीला नवसंजीवनी देण्याचे काम या कालावधीत झाले.
खा.नारायणराव राणे यांनी नेहमी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हिताला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे दळवी यांनी सुरुवातीपासूनच “शेतकरी केंद्रस्थानी” हे धोरण स्वीकारले. जिल्ह्याची अर्थव्यवस्था आंबा, काजू, नारळ, सुपारी आणि केळी या बागायती पिकांवर आधारित असल्याची जाणीव ठेवून त्यांनी केवळ आंबा आणि काजूपुरते मर्यादित न राहता नारळ व सुपारी या पिकांचाही हवामान आधारित फळपीक विमा योजनेत समावेश करून घेतला. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून हजारो शेतकऱ्यांना संरक्षण मिळवून देणारा हा निर्णय जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरला.

बँकेच्या पतधोरणातही अनेक मूलभूत बदल करण्यात आले. नियमित कर्जफेड करणाऱ्या आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल १ कोटी ९० लाख रुपयांची व्याजसवलत देण्यात आली. कर्जदारांना वेळेवर परतफेडीसाठी प्रोत्साहन देणारा हा उपक्रम राज्यातील जिल्हा बँकांसाठी आदर्श ठरला. जिल्हा संघ, तालुका संघ आणि विकास संस्थांना कमी व्याजदरात कर्जपुरवठा, मत्स्यव्यवसायासाठी स्वतंत्र धोरण, पीएमईजीपी, सीएमईजीपी, पीएमएफएमई यांसारख्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत विविध व्यवसायांना अर्थसहाय्य अशा निर्णयांमुळे ग्रामीण अर्थचक्राला चालना मिळाली.

पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्गच्या ओळखीला बँकेने आर्थिक पाठबळ दिले. पर्यटन उद्योगासाठी स्वतंत्र धोरण आखण्यात आले. हॉटेल, रिसॉर्ट, होमस्टे आणि पर्यटनाशी निगडित प्रकल्पांना सुलभ कर्जपुरवठा उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे रोजगारनिर्मिती बरोबरच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळ मिळाले. महिला सक्षमीकरणाला दळवी यांनी विशेष प्राधान्य दिले. महिला स्वयंसहाय्यता बचत गटांच्या कर्जमर्यादेत लक्षणीय वाढ करण्यात आली. बचत गटांना अधिक भांडवल उपलब्ध झाल्याने अनेक महिलांनी लघुउद्योग, प्रक्रिया उद्योग आणि सेवा व्यवसाय उभे केले. ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक व्यवहारांमध्ये सक्षम करण्यासाठी ‘बँक सखी’ उपक्रम सुरू करण्यात आला. यामुळे बँकिंग सेवा गावागावात पोहोचल्या आणि आर्थिक समावेशनाला नवी दिशा मिळाली.
युवा पिढीला सहकाराशी जोडण्यासाठी ‘न्यू जन कनेक्ट’ ही अभिनव योजना सुरू करण्यात आली. डिजिटल बँकिंग, आधुनिक सेवा आणि युवकाभिमुख उपक्रमांमुळे नव्या पिढीचा बँकेशी संवाद वाढू लागला. पारंपरिक सहकार आणि आधुनिक बँकिंग यांचा समन्वय साधण्याचा हा प्रयत्न विशेष ठरला. बँकेच्या अंतर्गत प्रशासनातही महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या. अनेक वर्षांपासून रखडलेली कर्मचारी भरती प्रक्रिया शासनाची मान्यता मिळवून अंतिम नियुक्तीच्या टप्प्यावर आणण्यात आली. विशेष म्हणजे या भरतीत केवळ जिल्हा रहिवाशांना स्थान मिळवून दिले आहे. त्यामुळे भविष्यातील मनुष्यबळाची गरज भागण्याबरोबरच बँकेच्या कार्यक्षमतेत वाढ होणार आहे. अजून दुसऱ्या टप्प्याची भरती करण्यचेही जाहीर केले आहे.
संस्थांचे संगणकीकरण, कोअर बँकिंग व्यवस्थेची अधिक परिणामकारक अंमलबजावणी, डायनॅमिक डे-एंड प्रणाली, ERP प्रणाली आणि डिजिटल व्यवहारांना चालना देत बँकेने तंत्रज्ञानाच्या युगात सक्षम पाऊल टाकले. विकास संस्था आणि प्राथमिक संस्थांच्या बळकटीकरणावरही विशेष भर देण्यात आला. व्यवस्थापन खर्चासाठी सहाय्य, शंभर टक्के कर्जवसुली करणाऱ्या संस्थांचा गौरव, सचिवांसाठी विमा संरक्षण, प्रशिक्षण कार्यक्रम, संगणकीकरणासाठी आर्थिक सहाय्य आणि अनिष्ट तफावतीतून संस्था बाहेर काढण्यासाठी पुनर्वसन निधी अशा अनेक निर्णयांमुळे सहकारी संस्थांची आर्थिक शिस्त अधिक मजबूत झाली. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढले पाहिजेत. यासाठी जिल्ह्यात उद्योजक निर्माण झाले पाहिजेत, असा खा नारायण राणे यांचा नेहमी आग्रह राहिला आहे. त्यामुळे बँकेने जिल्ह्यातील शेतकरी, महिला, युवक, मत्स्यव्यवसाय, दुग्धव्यवसाय, पर्यटन आणि ग्रामीण उद्योग यांना समान न्याय देणारे पतधोरण स्वीकारले. त्यामुळे केवळ कर्जवाटप करणारी संस्था न राहता जिल्ह्याच्या आर्थिक विकासाची प्रमुख भागीदार म्हणून बँकेची प्रतिमा अधिक दृढ झाली.
मनीष दळवी यांचा सहकारातील प्रवासही तितकाच उल्लेखनीय आहे. होडावडे विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संचालक आणि विद्यमान चेअरमन, जिल्हा नियोजन समिती सदस्य, वेंगुर्ला तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन, सावंतवाडी कन्झ्युमर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, जिल्हा खरेदी-विक्री संघाचे संचालक, महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे सदस्य अशी विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या. या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ जिल्हा बँकेच्या कारभारात झाला. सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत कोकण विकास संस्थेने त्यांना ‘कोकणरत्न’ पुरस्काराने सन्मानित केले. नुकतीच महाराष्ट्र राज्य काजू मंडळावर तज्ज्ञ संचालक म्हणून त्यांची निवड झाल्याने त्यांच्या सहकार आणि कृषी क्षेत्रातील योगदानावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
सहकार चळवळ ही केवळ ठेवी आणि कर्ज यापुरती मर्यादित नसते; ती ग्रामीण अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी असते. संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, सभासद आणि ग्राहक यांचा विश्वास संपादन करत, सक्षम पतधोरण, काटेकोर आर्थिक शिस्त, प्रभावी कर्जवितरण, समाधानकारक वसुली, तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यांच्या बळावर मनीष दळवी यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राज्याच्या सहकार क्षेत्रात वेगळे स्थान निर्माण करून दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बँकेची वाटचाल आता केवळ आर्थिक प्रगतीची नसून, सिंधुदुर्गच्या ग्रामीण विकासाला दिशा देणाऱ्या सहकाराच्या नव्या पर्वाची ठरत आहे.
सहकार क्षेत्रात यश मिळविण्यासाठी आर्थिक कौशल्य जितके आवश्यक असते, तितकीच गरज दूरदृष्टी, निर्णयक्षमता आणि लोकांशी असलेल्या नात्याची असते. मनीष दळवी यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गेल्या साडेचार वर्षांत केलेली वाटचाल ही याच सूत्राची साक्ष देते.
७५३१ कोटींच्या व्यवसायाची उंची, ५० कोटींचा निव्वळ नफा, आधुनिक बँकिंग, शेतकरी-केंद्रित निर्णय, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी संधी आणि सहकारातील विश्वासाची नवी उभारणी या सर्वांचा विचार केला तर हा प्रवास केवळ एका बँकेच्या वाढीचा नाही; तर सिंधुदुर्गच्या सहकार चळवळीला नवसंजीवनी देणाऱ्या नेतृत्वाचा आहे. २ ऑगस्टचा दिवस त्यामुळे केवळ मनीष दळवी यांच्या वाढदिवसाचा नाही, तर सहकारातून उभ्या राहिलेल्या एका नव्या नेतृत्वाचा प्रवास अधोरेखित करणारा दिवस ठरतो.
२०२२ मध्ये स्वीकारली धुरा… २०२६ मध्ये घडविला इतिहास!
आर्थिक स्थिती ३१.०३.२१- ते ३०.०६.२६-पर्यंत
एकूण व्यवसाय ४१३७ कोटींवरून ७५३१ कोटींवर १८२ %ची वाढ ——————————
निव्वळ नफा १४ कोटींवरून ५० कोटींवर ३६ कोटींनी वाढ —————————-
ढोबळ नफा ६३ कोटींवरून १५० कोटींवर २३८ %ची वाढ ——————————
ठेवी २२९२ कोटींवरून ४०००कोटींवर १७४ %ची वाढ ——————————
कर्जवाटप ११३५ कोटींवरून ३५४० कोटींवर ३११ % ची वाढ ——————————
स्वतःचा निधी २६९ कोटींवरून ६९३ कोटींवर २५६%ची वाढ ——————————
एनपीएमध्ये लक्षणीय घट ——————————
सलग ‘अ’ ऑडिट वर्ग
मनीष दळवी यांच्या अध्यक्षित काळात जिल्हा बँकेला मिळालेले पुरस्कार
📌सर्वोत्तम पेमेंट उपक्रम विभागासाठी नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन कॉपरेटिव बँक आणि बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य मासिक बँकिंग फंटिअर्स यांच्यामार्फत एफसीबीए 2022 पुरस्कार
📌बँकिंग सिस्टीम इंटेलिजन्स यासाठी बेस्ट कोअर बँकिंग सिस्टीम पुरस्कार
📌आयकॉनिक लीडरशिप अवॉर्ड २०२४ अंतर्गत राष्ट्रीय पातळीवरचा आऊटस्टँडिंग टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट टेन्शन इन रिटेल बँकिंग हा राष्र्ट्रीय कै वैकुंठ मेहता उत्कृष्ट सहकारी बँक पुरस्कार 2023 24
📌कै वैकुंठ मेहता उत्कृष्ट सहकारी बँक पुरस्कार २०२२-२३(सिं सिंधुदुर्ग जिल्हा बँक रत्नागिरी जिल्हा बँक यांना विभागून)
📌सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला सर्वोत्तम पेमेंट उपक्रम विभागासाठी एफसीबीए 2022 पुरस्कार नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन कॉपरेटिव बँक आणि बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य मासिक बँकिंग फंटिअर्स यांच्यामार्फत
📌बँको पुरस्कार २०२२ ते २०२४ सलग ३ वेळा..