महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग,दि.०९ऑक्टोबर
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी नवीन उती संवर्धन (टिश्यू कल्चर) प्रयोगशाळा स्थापन करण्याच्या घटकाचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांना प्रकल्प खर्चाच्या १०० टक्के, तर खासगी क्षेत्रातील संस्थांना प्रकल्प खर्चाच्या ४० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. नवीन उती संवर्धन प्रयोगशाळा स्थापन करण्यास इच्छुक असलेल्या पात्र संस्था व संबंधितांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील राज्यातील कृषी विद्यापीठे, शासन अंगीकृत संस्था आणि शासकीय प्रक्षेत्रांना नवीन उती संवर्धन प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी प्रकल्प मूल्याच्या १०० टक्के अनुदान देय असून, त्याची कमाल मर्यादा २५० लाख रुपये आहे. या प्रयोगशाळांमध्ये उपलब्ध उत्पादन तंत्रज्ञानाच्या आधारे मान्यता असलेल्या पिकांची किमान २५ लाख रोपे उत्पादित करणे आवश्यक आहे. आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध असलेल्या संस्थांनाच या घटकांतर्गत मंजुरी देण्यात येईल.
खासगी क्षेत्रातील नवीन उती संवर्धन प्रयोगशाळांसाठी प्रकल्प मूल्याच्या ४० टक्के अनुदान देण्यात येणार असून, त्याची कमाल मर्यादा प्रति प्रयोगशाळा १०० लाख रुपये आहे. या घटकांतर्गत उभारण्यात येणारा प्रकल्प बँक कर्जाशी निगडित असणे आवश्यक आहे. तसेच, प्रयोगशाळेत मान्यता असलेल्या पिकांची किमान २५ लाख रोपे उत्पादित करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.
या योजनेंतर्गत अनुदानाचा लाभ घेतलेल्या उती संवर्धन प्रयोगशाळांनी जैवतंत्रज्ञान विभागाच्या निर्धारित मानके व निकषांनुसार अनुदान मिळाल्यापासून १८ महिन्यांच्या आत मानांकन प्रमाणपत्र प्राप्त करणे बंधनकारक आहे.
नवीन उती संवर्धन प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in वर फलोत्पादन या घटकांतर्गत अर्ज करावेत. योजनेच्या अटी, पात्रता व अनुदानाबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.