पावसाने दडी मारल्याने भात लावणी केलेल्या जमीनीला गेले तडे ; शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत देण्यासाठी प्रयत्न करणार – मंत्री नितेश राणे
सिंधुदुर्ग,दि.१६ जुलै
राज्यातील बदलत्या हवामानामुळे आणि अपुऱ्या पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. विशेषतः कोकणात काही ठिकाणी शेती कोरडी पडू लागले आहे. भात लावणी केलेल्या जमिनीला भेगा पडत आहेत, तर भाताची रोपेही करपू लागली आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील तळेरे वाघाचीवाडी येथे प्रत्यक्ष भेट देऊन शेतीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच संबंधित कृषी अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. तसेच शेतकऱ्यांना या संकटातून दिलासा देण्यासाठी शासनामार्फत विशेष मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.
यावेळी माजी जि.प. बांधकाम सभापती बाळा जठार, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर, वैभववाडी मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे , उप कृषि अधिकारी उमाकांत पाटील, तालुका कृषी अधिकारी प्रविण ओहळ, मंडल कृषी अधिकारी अर्जुन जाधव, ग्रामपंचायत अधिकारी राजलक्ष्मी पेडणेकर, कृषी सेवक गजानन पवार, डॉ.विजय कुमार शेटये, पोलीस पाटील चंद्रकांत चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी मंत्री नितेश राणे यांनी शेतक-यांशी संवाद साधत प्रश्न जाणून घेतले.सर्व अधिका-यांना शेतक-यांच्या झालेल्या नुकसानीबाबत तातडीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने जनजागृती करा , अशा सुचना दिल्या. पालकमंत्री नितेश राणे तळेरे येथील बांधावर गेल्यामुळे शेतक-यांनी समाधान व्यक्त केले आहे.
