Sindhudurg : श्रेयस वसंत शहाकार यांची महाराष्ट्र राज्य युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड

शेअर करा

सिंधुदुर्गच्या युवा नेतृत्वाला राज्यस्तरीय संधी; निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

सिंधुदुर्ग,दि. ५ ऑक्टोंबर

भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला महत्त्वाचे स्थान मिळाले असून, श्रेयस वसंत शहाकार यांची महाराष्ट्र राज्य युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण यांच्या सूचनेनुसार प्रदेश सरचिटणीस व युवा मोर्चा प्रभारी मा. सुनील राणे तसेच युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी युवा मोर्चाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा केली.

श्रेयस शहाकार यांच्या या निवडीमुळे सिंधुदुर्गातील युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. संघटनात्मक कामाचा अनुभव, युवा वर्गाशी असलेला संपर्क आणि पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर राज्यस्तरीय जबाबदारी सोपविण्यात आल्याचे मानले जात आहे.

त्यांच्या निवडीबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच युवा वर्गातून अभिनंदन करण्यात येत आहे. शहाकार यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील युवकांचे प्रश्न आणि अपेक्षा राज्यस्तरावर प्रभावीपणे मांडल्या जातील, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.

या निवडीमुळे सिंधुदुर्गच्या युवा नेतृत्वाला राज्याच्या राजकारणात नवी संधी मिळाली असून, आगामी काळात श्रेयस शहाकार यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी ते प्रभावीपणे पार पाडतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शेअर करा