आ.निलेश राणे यांनी घेतली आक्रमक भूमिका ; पालकमंत्री नितेश राणे , खा. नारायण राणे यांनी केली अधिका-यांची कानउघडणी
सिंधुदुर्ग,दि.१५ जुलै
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून होत असलेल्या विकासकामांबाबत अखर्चित निधी तर काही विभागांमध्ये अधिका-यांची निष्क्रियता दिसल्याने आ. निलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत प्रत्येक विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत अधिका-यांना धारेवर धरले. तर पालकमंत्री नितेश राणे , खा. नारायण राणे यांनी अधिका-यांची कानउघडणी केली. वादळी वा-यासह झालेल्या पावसात महावितरणची झालेली दयनीय अवस्था आणत 50 तास लाईट बंद राहिली त्याला जबाबदार कोण ? असा सवाल करत महावितरणचा नियोजन शुन्य कारभार असल्याचा आरोप आ.निलेश राणे यांनी केला. या सभेत रखडलेली विकासकामे, वीजपुरवठा, आरोग्य सेवा, रस्ते, पर्यटन, शिक्षण, वन विभाग, पाटबंधारे, उद्योग आणि नगरविकास अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा झाली.
जिल्हा नियोजनची सभा पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला खा. नारायण राणे, आ. निलेश राणे, आ. दीपक केसरकर, आमदार निरंजन डावखरे, आ. अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर आ. निलेश राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, माझ्या मतदारसंघात ५० तास वीज नव्हती. पालकमंत्र्यांच्या माध्यमातून ३५० कोटी रुपयांची कामे झाली, पण त्याची अंमलबजावणी किती झाली? महावितरचा वॉर रुम कुठे आहे? अशी विचारणा केली. तसेच वर्षभर पूर्व नियोजन करुनच महावितरणने काम करण्याची मागणी केली. यावर अधिक्षक अभियंता यांनी कुडाळ येथे २४ तास कार्यरत वॉर रूम सुरू असल्याचे सांगितले. तसेच वीज लवकरात लवकर सुरु करण्याचे सांगितले. मात्र, आ. निलेश राणे यांनी वीज अधिका-यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी आपत्तीपूर्व तयारी करण्याच्या सुचना केल्या.
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था बिकट आहे. इमारती कोसळण्याच्या स्थितीत असून त्याठिकाणी जिल्हा नियोजनमध्ये असलेली तरतूद कमी असल्याचे आ. निलेश राणे यांनी सांगितले. जास्तीत जास्त दुरुस्तीचे प्रस्ताव करण्याच्या सुचना संबंधित अधिका-यांना देण्यात आल्या. तसेच आरोग्य विभागाच्या आढाव्यात आ. दीपक केसरकर यांनी मेडिकल कॉलेजमधून रुग्ण गोव्याला पाठवले जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर अधिकाऱ्यांनी सीटी स्कॅन, शस्त्रक्रिया आणि ओपीडी सेवा वाढल्याची माहिती दिली. जिल्हा रुग्णालयात ८ ऑगस्ट रोजी विशेष आरोग्य शिबिर होणार असल्याचे डॉ. श्रीपाद पाटील यांनी सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीसाठी आणि नव्या इमारतींसाठी अधिक निधीची मागणी करण्याची सुचना पालकमंत्र्यांनी दिली.
महावितरणकडून भूमिगत विद्युत पुरवठा करताना मारलेले खड्डे बुजवण्यासाठी 5 कोटीचा निधी देण्यात आला होता. मात्र, संबंधित काम कोणाला तरी दिले , ते काम व्यवस्थित झालेले नाही. किमान दीड फुट खड्डा बुजवण्याची गरज होती, असे सांगत कार्यकारी अभियंत्यांना आ. निलेश राणे यांनी धारेवर धरले. यासह जिल्ह्यातील अपूर्ण कामांची बिले काढणाऱ्या ठेकेदारांवर कारवाईची मागणी केली.रस्ते विकासाबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी खड्डे बुजविण्याची कामे दर्जेदार पद्धतीने करण्याचे निर्देश दिले.
वन विभागाच्या १३.१५ कोटी रुपयांच्या खर्चाबाबतही प्रश्न आ. निलेश राणे यांनी उपस्थित केला. वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी निधीचा नेमका उपयोग कसा झाला ? याचा अहवाल सादर करण्याचे मागणी केली. हत्ती व गवा रेडे आणि माकडांचा उपद्रव जशाच्या तसा आहे. शेतक-यांना कोणताही फायदा झालेला नाही. केवळ निविदा प्रक्रियेसाठी हा निधी आहे का? त्यावर वनअधिका-यांनी झालेल्या कामांबाबत माहिती देण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी आ. राणे यांनी तुम्ही व्हिडीओ आणि फोटो पालकमंत्र्यांकडे सादर करा, अशी सुचना केली.
पर्यटन, शिक्षण, नगरविकास, अनुसूचित जाती व आदिवासी विकास, महिला व बालकल्याण, दिव्यांग कल्याण, पाणीटंचाई, माहिती विभाग आदी विषयांवरही आ. निलेश राणे यांनी अधिका-यांना धारेवर धरत निधी खर्चाबाबत आणि केलेल्या तरतुदीबाबत चर्चा केली. झालेली तरतूद व संबंधित विभागांना आवश्यक असलेली गरज यावर सभागृहात चर्चा झाली. यावेळी कोसळलेल्या शाळांच्या इमारतींची तातडीने पाहणी करून दुरुस्ती करण्याच्या दृष्टीने काम करण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या. त्यावर शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी आपण जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या शाळांचा अहवाल तयार करुन सदर कामे मार्गी लावली जातील , असे सांगितले. तसेच जिल्हा परिषद बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांनी देखील जिल्ह्यातील विकासकामांच्या गतीबाबत आपण स्वत: आढावा घेत जिल्हा परिषद मधील निधी अखर्चित राहणार नसल्याचे सभागृहात सांगितले.
बैठकीच्या शेवटी पालकमंत्री नितेश राणे यांनी सर्व विभागांनी मंजूर निधी वेळेत खर्च करून विकासकामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रलंबित प्रस्ताव तातडीने सादर करून निधी परत जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन केले.
बैठकीत राज्य सरकारने दिलेला निधी जिल्हा नियोजन मध्ये 100 टक्के खर्च झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच कर्जमुक्ती योजना, काजू-आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई निर्णयांबद्दल, जिल्हावासियांना मुंबई गोवा महामार्गावर टोल सवलत, वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी केलेल्या उपाययोजना तसेच दशावतार कलाकारांना न्याय देण्याबद्दल महायुती सरकारचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , पालकमंत्री नितेश राणे , खा. नारायण राणे , आ. निलेश राणे यांचा अभिनंदन ठराव संमत करण्यात आले. सभेच्या प्रारंभी दुख:द निधन झाल्याबद्दल वारकरी व अन्य व्यक्तींबद्दल श्रध्दांजली वाहण्यात आली.
लघु पाटबंधारे विभागाचा व्हाईट पेपर काढण्याचे आदेश –
जिल्ह्यातील लघुपाटबंधारे विभागाकडून होणा-या कामांबाबत आ. निलेश राणे यांनी शंका व्यक्त केली. जिल्हानियोजनमधुन असलेली तरतूद कमी आहे. जलसंधारणची कामे करताना तुम्ही काय करता ? कोल्हापूर पध्दतीचे बंधारे म्हणजे काय? यासह विविध प्रकारचे प्रश्न विचारत अधिका-यांना निरुत्तर केले. यावेळी लघु पाटबंधारे विभागाला “व्हाईट पेपर” मागणी केली. त्यावर पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाचा आढावा घेवून व्हाईट पेपर काढावा , अशा सुचना दिल्या.