६ ऑक्टोबर रोजी मायनाक भंडारी सभागृहात आयोजन
सिंधुदुर्ग,दि.०१ ऑक्टोंबर
निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या निवृत्तीवेतनाशी संबंधित विविध सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या ‘महा-उपलब्धी’ (Maha-UPLABDHI) मोबाईल अॅपबाबत जिल्हा कोषागार कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील मायनाक भंडारी सभागृह येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी अरुणा हसबे यांनी केले आहे.
‘महा-उपलब्धी’ मोबाईल अॅपच्या पहिल्या टप्प्यात निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या मासिक व वार्षिक निवृत्तीवेतनाचा तपशील, आयकर दाखला, e-PPO लायब्ररी तसेच उत्पन्नाचा दाखला PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आला आहे.
अॅपच्या दुसऱ्या टप्प्यात डिजिटल जीवन प्रमाणपत्र (Online Life Certificate) सादर करण्याची सुविधा विकसित करण्यात आली आहे. नोव्हेंबर २०२६ महिन्यासाठीचे जीवन प्रमाणपत्र याच मोबाईल अॅपद्वारे स्वीकारण्याचे प्रस्तावित असून, त्यामुळे निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या ऑनलाइन जीवन प्रमाणपत्र सादर करणे शक्य होणार आहे.
‘महा-उपलब्धी’ मोबाईल अॅपच्या सुविधांबाबत निवृत्तीवेतनधारकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने राज्यातील सर्व कोषागार कार्यालयांमध्ये एकाच दिवशी कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेस वित्त विभागाचे प्रधान सचिव (लेखा व कोषागारे) ऑनलाइन उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. अॅपचा वापर, उपलब्ध सुविधा तसेच डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या प्रक्रियेबाबत कार्यशाळेत माहिती देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी दि. ६ ऑक्टोबर रोजी आयोजित कार्यशाळेस उपस्थित राहून ‘महा-उपलब्धी’ मोबाईल अॅपच्या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी अरुणा हसबे यांनी केले आहे.