सिंधुदुर्गनगरीतील नागरिकांना हक्काचा सातबारा ; आदर्श शहर निर्माण करण्यासाठी आमचा प्रयत्न
सिंधुदुर्ग,दि.०४ ऑगस्ट
गेल्या अनेक वर्षापासून सिंधुदुर्गनगरीतील नागरिकांच्या हक्काच्या जमिनीचा सातबारा त्यांच्या नावावर देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सातबारा लोकार्पण पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. सिंधुदुर्गनगरीचा सर्वांगीण विकास साधला जाईल. पुढील पाच वर्षांत जिल्हा मुख्यालयाचा कायापालट करत आदर्श शहर म्हणून विकसित केला जाईल, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्गनगरी नगरपंचायतीची घोषणा होणार आहे. नवनगर प्राधिकरण रहिवासी संघ, सिंधुदुर्गनगरी यांच्या वतीने आयोजित सातबारा लोकार्पण सोहळा शरद कृषी भवन येथे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, उपाध्यक्ष दादा साईल, तहसीलदार चैताली सावंत, जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर, ओरोस सरपंच पांडुरंग मालवणकर, रानबांबुळी सरपंच परशुराम परब, प्राधिकरण संघाचे अध्यक्ष आदेश नाईक यांच्यासह नागरिक उपस्थित होते.