वेंगुर्ल्यात सुमारे ७०० कोटींची गुंतवणूक; रोजगाराच्या नव्या संधींसह जिल्ह्याचा पर्यटन विकास वेगाने होणार — भाजपचा दावा
देवगड,दि. १९ ऑगस्ट
वेंगुर्ला येथे सुमारे ७०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून ताज हॉटेल उभारण्याच्या प्रकल्पाचा करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत झाल्याने सिंधुदुर्गच्या पर्यटन क्षेत्रासाठी हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे मत भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी व्यक्त केले.
जामसंडे येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत साटम बोलत होते. १८ ऑगस्ट २०२६ हा दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासातील सुवर्ण दिवस म्हणून नोंदला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वेंगुर्ल्यात ताजसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या हॉटेलची सुरुवात होणे ही जिल्ह्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने मोठी उपलब्धी असल्याचे साटम यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील. तसेच देशाच्या पर्यटन नकाशावर सिंधुदुर्गचे स्थान अधिक मजबूत होण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.
या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन विभाग तसेच स्थानिक खासदार आणि पालकमंत्री नितेश राणे यांनी केलेल्या प्रयत्नांचे साटम यांनी कौतुक केले. अशा मोठ्या गुंतवणूक प्रकल्पांचे जिल्ह्यात स्वागत करून त्यांना प्रोत्साहन दिल्यास भविष्यात आणखी गुंतवणूकदार सिंधुदुर्गकडे आकर्षित होतील. त्यातून पर्यटन, रोजगार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळून जिल्ह्याचा कायापालट होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“ताज हॉटेलच्या या प्रकल्पाचे देवगडवासीय आणि सिंधुदुर्गवासीयांच्या वतीने आम्ही मनापासून स्वागत करतो. जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे,” असे साटम यांनी सांगितले.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र भुजबळ, देवगड-जामसंडे नगरपंचायतीचे गटनेते शरद ठुकरुल, भाजप शहराध्यक्ष वैभव करगुटकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष दयानंद पाटील, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, उल्हास मंचेकर, नरेश डांबरी, मकरंद जोशी, प्रकाश गोगटे, सुभाष धुरी आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.