तळेरे : सोशल मीडियावरील १२ हजार फॉलोवर्सचा आनंद स्नेहसिंधू आश्रमातील निराधारांसोबत साजरा

शेअर करा

फोंडाघाटच्या क्रांती वेंगुर्लेकरचा प्रेरणादायी सामाजिक उपक्रम

तळेरे ,दि.०२ जुलै
आजच्या काळात सोशल मीडियावरील यशाचा आनंद अनेकजण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. कोणी मित्रमंडळींसोबत, कोणी कुटुंबासोबत, तर कोणी आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत हा आनंद वाटून घेतात. मात्र फोंडाघाट येथील क्रांती वेंगुर्लेकर हिने हा आनंद समाजोपयोगी कार्यातून साजरा करून एक प्रेरणादायी आदर्श घालून दिला.


कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील रहिवासी असलेली क्रांती वेंगुर्लेकर सध्या मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथे भारतीय डाक विभागात शाखा पोस्टमास्तर म्हणून कार्यरत आहे. तिने आपले दैनंदिन कार्यालयीन कामकाज, घरातील जबाबदाऱ्या सांभाळून काही महिन्यांपूर्वी तिने सोशल मीडियावर विविध मंदिरांची माहिती, इतिहास व वैशिष्ट्ये सांगणारे माहितीपूर्ण व्हिडिओ तयार करून प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. तिच्या या व्हिडिओंना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आणि तिच्या फॉलोवर्सची संख्या झपाट्याने वाढू लागली.


व्हिडिओ अधिक दर्जेदार बनवण्यासाठी तिने त्या क्षेत्रातील व्यक्तींकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने तिने स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवत एक निर्धार केला. सोशल मीडियावर १० हजार फॉलोवर्स पूर्ण झाल्यानंतर फोंडाघाट येथील स्नेहसिंधू आश्रमाला आपल्या कमाईतून शक्य असेल त्या पद्धतीने मदत करायची, असा संकल्प तिने केला.


तिच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळाले आणि अवघ्या काही महिन्यांत तिचे १० हजार नव्हे, तर तब्बल १२ हजार फॉलोवर्स पूर्ण झाले. या आनंदाचे औचित्य साधत तिने स्नेहसिंधू आश्रमाला भेट दिली. तेथील निराधार ज्येष्ठांसोबत केक कापून तिने आपल्या यशाचा आनंद साजरा केला. त्यानंतर आपल्या मेहनतीतून जमा केलेल्या रक्कमेतून आवश्यक असणार्या वस्तू आश्रमाकडे सुपूर्द करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.


आजच्या सोशल मीडिया-केंद्रित युगात स्वतःच्या यशाचा आनंद केवळ वैयक्तिक न ठेवता तो समाजातील निराधारांसोबत वाटून घेण्याचा क्रांती वेंगुर्लेकर हिचा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे. एवढ्या कमी वयात तिच्यात दिसून आलेली सामाजिक जाणीव, संवेदनशीलता आणि समजूतदारपणा हे तिच्यावर झालेल्या उत्तम संस्कारांचे जिवंत उदाहरण असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

शेअर करा