तळेरे: दळवी महाविद्यालयाचा बारावा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी उत्साहात संपन्न

शेअर करा

तळेरे,दि.१६ जुलै

तळेरे येथील मुंबई विद्यापीठाचे विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाचा बारावा वर्धापन दिन ११ ते १४ जुलै २०२६ या कालावधीत विविध शैक्षणिक, बौद्धिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या विविध स्पर्धा, बुद्धिमत्ता चाचण्या तसेच गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले.
समारोप समारंभास जिल्हा परिषद सदस्या सौ.प्राची इस्वलकर, तलाठी सचिन काळेबेरे, कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल, खारेपाटण ग्रामपंचायत सदस्य किरण कर्ले तसेच सिंधुदुर्ग उपपरिसर संचालक व दळवी महाविद्यालयाचे समन्वयक श्रीपाद वेलींग यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. प्रास्ताविकात सहाय्यक प्राध्यापक हेमंत महाडिक यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासून झालेल्या प्रगतीचा आढावा घेत विविध अभ्यासक्रमांच्या विस्ताराची माहिती दिली. तसेच महाविद्यालयाचे मानद मार्गदर्शक विनायक दळवी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा गौरव करत, त्यांच्या प्रेरणेमुळे संस्था गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे केंद्र म्हणून विकसित झाल्याचे नमूद केले.
यावेळी बोलताना दयानंद कुबल यांनी महाविद्यालयाच्या उभारणीसाठी झालेल्या अथक परिश्रमांचे कौतुक केले. शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनुसार शिक्षण तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचे कार्य अशा संस्था करत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्राची इस्वलकर यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयाचे संस्थापक विनायक दळवी यांची दूरदृष्टी, प्राचार्यांचे नेतृत्व आणि प्राध्यापकांची निष्ठा यामुळे महाविद्यालयाची सातत्याने प्रगती होत असल्याचे सांगितले. शिक्षण हे केवळ आर्थिक प्रगतीसाठी नसून, सुसंस्कृत व जबाबदार नागरिक घडविण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
श्रीपाद वेलींग यांनी २०१४ मध्ये लावलेले शिक्षणाचे रोपटे आज बाराव्या वर्षात बहरले असून, एका तपाची यशस्वी वाटचाल पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त केला. महाविद्यालयाच्या प्रगतीत केंद्र व राज्य शासन, मुंबई विद्यापीठ, कुलगुरू, प्र-कुलगुरू, संस्थेचे पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी, प्राध्यापक आणि विशेषतः विनायक दळवी यांचे मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.
वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘गार्गी डे’ बुद्धिमत्ता चाचणीत प्रथम क्रमांक कु. ऋतुजा साळुंखे (प्रथम वर्ष बी.एस्सी. आयटी) हिने, तर ‘चाणक्य डे’ बुद्धिमत्ता चाचणीत प्रथम क्रमांक दिव्येश चव्हाण (प्रथम वर्ष बी.एस्सी. आयटी) याने मिळविला.
यानंतर विविध स्पर्धांचे निकाल जाहीर करण्यात आले. विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. वक्तृत्व, बुद्धिमत्ता, सांस्कृतिक कला आणि नेतृत्वगुणांच्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत उपस्थितांची दाद मिळवली.
स्पर्धांचे परीक्षण स्वरा डंबे (संचालिका, स्मित लोन्स तळेरे ) आणि श्रावणी मदभावे (संचालिका, श्रावणी कॉम्प्युटर तळेरे ) यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापक नरेश शेट्ये यांनी केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सहाय्यक प्राध्यापिका पूजा भागवत यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी महाविद्यालयाच्या वतीने सर्व विजेते आणि सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

शेअर करा