२१ महिलांनी प्रत्यक्ष कोकोडामा तयार करत घेतला हरित उद्योजकतेचा अनुभव
तळेरे,दि.०३ ऑगस्ट
महिला व्यापारी संघटना, तळेरे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली मोफत कोकोडामा कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. पर्यावरण संवर्धन, सर्जनशीलता, कौशल्य विकास आणि स्वयंरोजगाराला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यशाळेत २१ महिला उद्योजिका व सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यशाळेत कोकोडामा तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया, योग्य वनस्पतींची निवड, निगा राखण्याच्या पद्धती, घरसजावटीतील उपयोग तसेच या कलेच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शक श्रावणी मदभावे म्हणाल्या, “छंदाला कौशल्याची जोड दिली तर तोच भविष्यात उत्पन्नाचा सक्षम मार्ग ठरू शकतो.” सहभागी महिलांनी स्वतःच्या हाताने कोकोडामा तयार करत पर्यावरणपूरक कलेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. निकिता पवार व शिवानी राणे यांनी सहाय्यक म्हणून मोलाचे सहकार्य केले.
यावेळी महिला व्यापारी संघटना, तळेरेच्या अध्यक्षा सौ. संपदा महाडिक यांनी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या अशा कौशल्याधारित उपक्रमांचा उद्देश विशद केला. महिलांना कौशल्याधारित प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबनाकडे वाटचाल करण्याची संधी उपलब्ध करून देणे आणि पर्यावरणपूरक उपक्रम समाजात रुजविणे हा महिला व्यापारी संघटनेचा प्रमुख उद्देश आहे. भविष्यातही महिलांसाठी अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेच्या शेवटी सहभागी महिलांनी अशा पर्यावरणपूरक, कौशल्याधारित आणि रोजगाराभिमुख उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यशाळेचा लाभ तळेरे पंचक्रोशीतील महिलांनी घेतला. यावेळी महिला व्यापारी संघटना, तळेरेच्या सर्व पदाधिकारी उपस्थित होत्या. उपस्थितांनी या अभिनव उपक्रमाचे मनापासून कौतुक करत भविष्यातही अशा उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचा निर्धार व्यक्त केला.