तळेरे,दि. २२ जून
२१ जून २०२६ रोजी शिडवणे नं. १ शाळेत 'जागतिक योग दिवस' अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि निरोगी जीवनशैलीची सवय लागावी या उद्देशाने सकाळी ठीक ८.०० ते ९.०० या एक तासाच्या कालावधीत विशेष योग प्रात्यक्षिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत योगशिक्षिका वेदिका चव्हाण मॅडम, हेमा वंजारी मॅडम आणि योगशिक्षक सुरेंद्र यादव सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करून घेतली.
यावेळी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उभे राहून करावयाची, बसून करावयाची, पोटावर झोपून करावयाची आणि पाठीवर झोपून करावयाची अशी विविध योगासने शास्त्रोक्त पद्धतीने केली. शारीरिक आसनांसोबतच मनाची एकाग्रता आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी विद्यार्थ्यांकडून विविध प्राणायाम प्रकारांचाही सराव करून घेण्यात आला.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी या संपूर्ण कार्यशाळेत अत्यंत उत्साहाने आणि सक्रियपणे सहभाग नोंदवला. आरोग्याचा मूलमंत्र देणाऱ्या या योग दिनाची सांगता अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात झाली.