तळेरे : तुकाराम मुंडे यांच्या अन्नसुरक्षा मोहिमेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात अन्नपदार्थ व पाणी तपासणी अभियान

शेअर करा

खारेपाटण येथून मोहिमेला प्रारंभ; तळेरेसह प्रमुख बाजारपेठांतील २७५ हॉटेल व अन्नपदार्थ व्यावसायिकांचा सहभाग

तळेरे,दि.०६ ऑगस्ट

राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा कारभार स्वीकारल्यानंतर राज्यभर अन्नसुरक्षा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीला गती मिळाली आहे. भेसळमुक्त, सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ नागरिकांना उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने महाराष्ट्रभर अन्नपदार्थ व पिण्याच्या पाण्याच्या तपासणीची व्यापक मोहीम राबविण्यात येत असून जनजागृतीबरोबरच आवश्यक ती कारवाईही करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, सिंधुदुर्ग जिल्हा हॉटेल संघटना आणि सर्व तालुका व्यापारी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभर अन्नपदार्थ व पाणी तपासणी अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाचा शुभारंभ खारेपाटण बाजारपेठेत करण्यात आला. त्यानंतर तळेरे, कणकवली शहर, जानवली, कलमठ व वागदे या ठिकाणी अन्नपदार्थ व पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्ता तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरांना व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तळेरे येथील ६५, खारेपाटणमधील ३५ तसेच कणकवली शहर, जानवली, कलमठ आणि वागदे येथील व्यावसायिकांसह एकूण १७५ हॉटेल व अन्नपदार्थ व्यावसायिकांनी या अभियानाचा लाभ घेत आपल्या अन्नपदार्थांची व पिण्याच्या पाण्याची तपासणी स्वयंस्फूर्तीने करून घेतली. या उपक्रमामुळे अन्नसुरक्षेबाबत व्यापाऱ्यांमध्ये सकारात्मक जागरूकता निर्माण झाली.

संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये हे तपासणी कॅम्प आयोजित करण्यात आले असून प्रमुख बाजारपेठांमध्ये गुणवत्ता तपासणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. जिल्हा अन्न व औषध प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या या अभियानात अन्नसुरक्षा कायदा, स्वच्छता, परवाना प्रक्रिया, अन्नपदार्थांची गुणवत्ता, पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता तसेच ग्राहकांना सुरक्षित व दर्जेदार अन्न उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक नियमांचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय सावंत, कार्यवाह राजू जठार,जिल्हा हॉटेल संघटनेचे अध्यक्ष राजन नाईक तसेच सर्व तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष यांनी जिल्ह्यातील सर्व खाद्यपदार्थ विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या अन्नपदार्थांची व पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी करून घ्यावी, अन्नसुरक्षा कायद्याचे काटेकोर पालन करावे आणि ग्राहकांना सुरक्षित, स्वच्छ व गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले.

अन्नसुरक्षा ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून व्यापारी आणि ग्राहक यांचीही सामूहिक जबाबदारी आहे. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत अशा तपासणी मोहिमांमध्ये सहभागी झाल्यास ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ होईल, सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण होईल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरक्षित व गुणवत्तापूर्ण अन्नपुरवठ्याची सुदृढ व्यवस्था निर्माण होण्यास निश्चितच मदत होईल.

शेअर करा