तळेरे : रघुकुल स्वर विहार विद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींना प्रथम श्रेणीत ‘विशारद’ पदवी

शेअर करा

अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाच्या एप्रिल २०२६ परीक्षेत सानिका संजय गावडे व श्रुती शरद सावंत यांचे उल्लेखनीय यश; सावंतवाडीच्या संगीत क्षेत्रात मानाचा तुरा

तळेरे,दि.०३ जुलै

अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाच्या एप्रिल २०२६ परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, सावंतवाडी येथील रघुकुल स्वर विहार विद्यालयाच्या सानिका संजय गावडे व श्रुती शरद सावंत यांनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत विशारद पदवी प्राप्त केली आहे.

सानिका व श्रुती या दोघीही गेली १४ वर्षे रघुकुल स्वर विहार, सावंतवाडी येथे गुरू नूतन परब यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेत आहेत. तसेच पुढील संगीत शिक्षणासाठी त्या पंडित डॉ. समीर दुबळे गुरुजी यांचेही मार्गदर्शन घेत आहेत.

सानिका संजय गावडे ही सध्या बेळगाव येथे एम. फार्मचे शिक्षण घेत आहे, तर श्रुती शरद सावंत ही कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात बी.ए.च्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. शैक्षणिक अभ्यासक्रम सांभाळत दोघींनी संगीतसाधनेत सातत्य राखून हे यश संपादन केले आहे.

या यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना सानिका व श्रुती यांनी सांगितले की, “आमच्या या यशाचे श्रेय गुरूसौ.नूतन परब व पंडित डॉ. समीर दुबळे गुरुजी यांच्या उत्तम मार्गदर्शनाला जाते. त्यांनी आमच्यासाठी घेतलेली मेहनत, तसेच आई-वडिलांनी दिलेला खंबीर पाठिंबा यामुळेच आम्हाला इथपर्यंत पोहोचणे शक्य झाले. अजूनही आम्हाला संगीत क्षेत्रात खूप काही शिकायचे आहे. विशारद पदवी हा आमच्या पुढील संगीत प्रवासातील एक छोटासा टप्पा आहे.”

सानिका गावडे व श्रुती सावंत यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

शेअर करा