वैभववाडी महाविद्यालयातनशामुक्त सामुहिक शपथ कार्यक्रम संपन्न

शेअर करा

वैभववाडी,दि.३१ जुलै

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नशामुक्त जनजागृती अभियान-मुंबई २०२६ अंतर्गत गुरूवार दि. ३० जुलै रोजी नशामुक्त सामुहिक शपथ कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.आर. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. माणिक चौगुले, स्टाफ सचिव प्रा.सुरेश पाटील व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सत्यजीत राजे उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली गठीत नशामुक्त जनजागृती
उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून मुंबई शहर व मुंबई उपनगरात ‘नशामुक्त जनजागृती अभियान-मुंबई २०२६ व सामुहिक शपथ कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
युवकांमध्ये अंमली पदार्थ व विविध व्यसनाच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण करणे, प्रतिबंधात्मक दृष्टीकोन विकसित करणे आणि नशामुक्त समाज निर्मितीसाठी शाळा- महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढविणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश असल्याचे प्रस्ताविक मनोगतात प्रा.सुरेश पाटील यांनी सांगितले.
आज शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील तरूण युवक युवतींमध्ये व्यसनाधीनता वाढत आहे. यांची वेळीच जाणिव व त्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासन व मुंबई विद्यापीठाने हाती घेतलेल्या उपक्रमाचे स्वागत करतो. या अभियानाची महाविद्यालयात योग्यप्रकारे अंमलबजावणी करण्यासाठी “नशामुक्ती मार्गदर्शन व समुपदेशन समिती” स्थापन करीत असल्याचे प्राचार्य डॉ.के.आर.चव्हाण यांनी सांगितले. समिती समन्वयक म्हणून प्रा.सुरेश पाटील तर प्रा. रमेश काशेट्टी, प्रा.सत्यजित राजे व प्रा. प्रतिमा मांजरेकर या सदस्य म्हणून काम पाहतील.
या समितीने महाविद्यालयाबरोबरच समाजात जनजागृती करावी असे आवाहन प्राचार्य डॉ. के.आर. चव्हाण यांनी केले.
यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अंमली पदार्थ व्यसन मुक्ती शपथ घेतली.
शेवटी या कार्यक्रमाचे आभार उपप्राचार्य डॉ. माणिक चौगुले यांनी मांडले तर सुत्रसंचालन प्रा. सत्यजित राजे यांनी केले.

शेअर करा