वैभववाडी-नाधवडे परिसरातील प्रकरण; सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय
वैभववाडी,दि.१० ऑगस्ट
नाधवडे, ता. वैभववाडी परिसरातील आंब्याच्या बागेत काम करणाऱ्या विवाहित कामगार महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपातील संशयित आरोपी रामचंद्र तुकाराम भोगम याचा अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश मा. न्या. सूर्यकांत इंदलकर यांनी हा निर्णय दिला.
मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२६ मध्ये वैभववाडी-नाधवडे परिसरातील आंब्याच्या बागेत असलेल्या एका बंगल्याच्या शेतघरात स्वयंपाक व घरातील कामांसाठी संबंधित महिलेला कामगार म्हणून ठेवण्यात आले होते. २३ एप्रिल २०२६ रोजी घरातील पाहुणे बाहेर गेल्यानंतर संशयिताने महिलेला घरात कोंडून तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार महिलेने वैभववाडी पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
या तक्रारीवरून वैभववाडी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(१) अन्वये संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी फरार झाला होता. त्यानंतर त्याने सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला.
या अर्जावर झालेल्या सुनावणीदरम्यान गुन्ह्याचे गांभीर्य, मुद्देमाल जप्त न होणे तसेच तपासाच्या दृष्टीने आवश्यक बाबी न्यायालयासमोर मांडण्यात आल्या. पीडितेच्या वकिलांनीही न्यायालयाच्या निदर्शनास संबंधित बाबी आणून दिल्या. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने संशयित आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.
या प्रकरणाचा पुढील तपास सपोउनि. श्री. आगा करीत आहेत.