वेंगुर्ल्यात डॉ. कुमार सप्तर्षी यांना श्रद्धांजली; फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचतर्फे शोकसभा

शेअर करा

बॅ. नाथ पै समुदाय केंद्रात मान्यवरांनी वाहिली आदरांजली; समाजासाठीच्या त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण स्मरण.

वेंगुर्ले ,दि.०१ ऑगस्ट

महाराष्ट्राचे ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार आणि पत्रकार डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनानंतर फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचच्या वतीने वेंगुर्लेतील बॅ. नाथ पै समुदाय केंद्रात शोकसभा घेण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याला उजाळा देत समाजाला दिलेल्या योगदानाची आठवण काढली.

शोकसभेच्या अध्यक्षस्थानी विचारमंचाचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर होते. या शोकसभेला विचारमंचचे उपाध्यक्ष डॉ. प्रा. सुनील भिसे, खजिनदार प्रदीप सावंत, सचिव महेंद्र मातोंडकर, माजी उपनगराध्यक्ष वामन कांबळी, आत्माराम ऊर्फ दादा सोकटे, प्रा. डॉ. सचिन परूळकर, सुनील जाधव, किशोर सोन्सुरकर, प्रेमानंद जाधव, वाय. जी कदम, शिवराम आरोलकर, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला दोन मिनिटे स्तब्धता पाळून आणि डॉ. सप्तर्षी यांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेला सुरुवात झाली.

“सत्तेसाठी नव्हे, विचारांसाठी जगलेले नेते”
प्रमुख वक्ते म्हणून बोलताना खर्डेकर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सुनील भिसे म्हणाले, कुमार सप्तर्षी हे केवळ राजकीय नेते नव्हते. ते स्वतः एक विचारपीठ होते. राजकीय बदलांच्या काळात मागे पडत चाललेल्या समाजवादाला त्यांनी आपल्या लेखणीतून आणि कृतीतून जिवंत ठेवले. वैद्यकीय पेशासोबतच त्यांनी आयुष्यभर जातीभेद, अंधश्रद्धा आणि शोषणाविरोधात आवाज उठवला. त्यांचा साधेपणा आणि तत्वनिष्ठा हीच आमची खरी शिदोरी आहे.

विचारमंचाचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांनी यावेळी सांगितले की, सप्तर्षींचे जाणे ही सामाजिक चळवळीची भरून निघणारी हानी आहे. ते शेवटपर्यंत फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांसाठी झटत राहिले.

समाजवादी आणि आंबेडकरी चळवळीचा कणा
ज्येष्ठ पत्रकार प्रदीप सावंत यांनी नमूद केले की, कुमार सप्तर्षींच्या जाण्याने महाराष्ट्रातील समाजवादी चळवळीचा कणा मोडला आहे. त्यांनी कधीही पद किंवा सत्तेचा विचार केला नाही. त्यांची पुस्तके आणि व्याख्याने ही येणाऱ्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरतील.

आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते वाय. जी. कदम म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समता आणि बंधुत्वाचे विचार घराघरात पोहोचवण्यात सप्तर्षींचा मोठा वाटा आहे.

माजी नगरसेवक आत्माराम उर्फ दादा सोकटे, प्रा. डॉ. सचिन परुळकर, शिवराम आरोलकर यांनीही सप्तर्षींच्या शैक्षणिक, साहित्यिक आणि ग्रामीण कार्याचा गौरव केला. ते ग्रामीण कार्यकर्त्यांसाठी नेहमीच प्रेरणा होते, असे आरोलकर म्हणाले. सूत्रसंचालन आणि आभार महेंद्र मातोंडकर यांनी मानले.

शेअर करा