वेंगुर्ला ,दि.१ सप्टेंबर (प्रथमेश गुरव)
गाव विकासाच्या निर्णयप्रक्रियेत युवकयुवतींचा सक्रीय सहभाग महत्त्वाचा आहे. पंचायत राज व्यवस्था ही लोकशाहीच्या मुळाशी जोडलेली व्यवस्था असून युवकांनी ग्रामसभेपासून स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंतच्या प्रक्रियेत सहभागी होऊन आपल्या गावाच्या विकासात योगदान दिले पाहिजे असे प्रतिपादन मार्गदर्शक प्रगती चव्हाण यांनी तुळस येथे केले.
वेताळ प्रतिष्ठान आणि कोकण विकास संस्था, पणजी यांच्या संयुक्त विद्यमाने विलिड उपक्रमांतर्गत तुळस येथील श्री शिवाजी हायस्कूलच्या कर्मयोगी रामभाऊ तुळसकर स्मृती सभागृहात युवक-युवती नेतृत्व शिबिर घेण्यात आले. याचे उद्घाटन पंचायत समितीचे सभापती शंकर घारे यांच्या हस्ते झाले. यावेळी हायस्कूलचे मुख्याध्यापक विनायक कोल्हे, प्रगती चव्हाण, संदिप तुळसकर, वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.सचिन परूळकर, महेश राऊळ, अ·िानी चव्हाण, संजना तुळसकर, सोनाली नाईक, बबन घोडे-पाटील आदी उपस्थित होते. नेतृत्व म्हणजे केवळ पद मिळवणे नव्हे, तर संकटाच्या काळात योग्य निर्णय घेणे, इतरांना सोबत घेणे आणि समाजाच्या हितासाठी जबाबदारी स्वीकारणे ही आहे. युवक-युवतींनी आत्मविश्वास, संवादकौशल्य, निर्णयक्षमता आणि ताण-तणाव हाताळण्याची क्षमता विकसित केली, तर ते स्वतःच्या आयुष्यासोबतच आपल्या गावाच्या विकासातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात, असेही प्रगती चव्हाण यांनी सांगितले.
आजच्या युवकांनी शिक्षणासोबतच सामाजिक भान, नेतृत्वगुण आणि निर्णयक्षमता विकसित केली पाहिजे. गावाच्या विकासासाठी पुढाकार घेणारी आणि समाजाला सकारात्मक दिशा देणारी युवा पिढी घडणे ही काळाची गरज असल्याचे सभापती शंकर घारे यांनी सांगितले.
शिबिरामध्ये युवक-युवतींमध्ये नेतृत्वगुण, संवादकौशल्य, निर्णयक्षमता, ताण-तणाव व्यवस्थापन, सामाजिक जबाबदारी, टीमवर्क तसेच स्थानिक विकासामधील युवकांची भूमिका याबाबत विविध उपक्रम आणि मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानिया वराडकर यांनी तर आभार प्रदर्शन वैष्णवी परूळकर यांनी मानले.