रानभाज्यांची ओळख आणि व्यावहारिक शिक्षणाचा अनोखा उपक्रम; पालक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, विद्यार्थ्यांना विक्रीतून आर्थिक लाभ
वेंगुर्ला,दि.१९ जुलै(प्रथमेश गुरव)
झाराप-कामळेवीर शाळेमध्ये आयोजित केलेल्या रानभाज्या व विक्री महोत्सवाला पालकांचा व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मुलांनी भाज्यांची विक्री करत सुमारे साडेआठ हजारांची उलाढाल केली.
निसर्गाचा अनमोल ठेवा असलेल्या रानभाज्यांची ओळख नव्या पिढील व्हावी आणि मुलांमध्ये व्यावहारीक ज्ञान रूजावे या उद्देशाने मुख्याध्यापक विजय कदम, उपशिक्षक विलास गोठोस्कर, भालचंद्र आजगांवकर, रूचिता राऊळ, श्री.झणझणे यांच्या मार्गदर्शनाखाली १८ जुलै रोजी हा उपक्रम घेण्यात आला होता. शाळेच्या मुलांनी जंगलातून गोळा केलेल्या करटोली, कुड्याच्या शेंगा, शेवग्याचा पाला, कुर्डू, लालमाठ, काकडी, पेवगा, घोटीची वेल, भारंगी, एक पानाची भाजी, हळदीची पाने, अळू, अळूवड्याची पाने, निरफण, सुरण, सुरणाची पाने आणि केळफूल आदी भाज्या प्रदर्शनासाठी तसेच विक्रीसाठी मांडल्या होत्या. दरम्यान, पालक व ग्रामस्थांनी या उपक्रमाला भेट देत भाज्यांची खरेदी केली. भाज्यांच्या विक्रीतून सुमारे साडेआठ हजारांचा आर्थिक फायदा मुलांना झाला. या उपक्रमाबद्दल पालक व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.