सावंतवाडी, दि. ४ जून
डोक्यावर सुरक्षित छप्पर नाही, घरात कमावता माणूस नाही, सोबतीला अत्यंत हलाखीची परिस्थिती आणि तोंडावर आलेला पावसाळा… अशा विदारक परिस्थितीत जगणाऱ्या इन्सुली पागावाडी येथील एका ६५ वर्षीय वृद्ध विधवा महिला आणि त्यांच्या गंभीर आजारी मुलाच्या मदतीसाठी भाजपचे युवा नेते विशाल परब धावून आले आहेत. त्यांनी या कुटुंबाला तातडीने आर्थिक आणि व्यावहारिक मदतीचा हात दिला आहे.
इन्सुली पागावाडी येथील श्रीमती जनाबाई धोंडू पाटील (वय ६५) या वृद्ध महिला आपल्या मुलासह अत्यंत मोडकळीस आलेल्या घरात राहत आहेत. या घराचे छप्पर पूर्णपणे उडून गेले असून भिंतींना मोठ्या भेगा गेल्या आहेत. १५-२० दिवसांपूर्वीच या घराचा एक मोठा भाग कोसळला होता. त्यामुळे यंदाचा पावसाळा या घरात कसा काढायचा, अशी मोठी चिंता या कुटुंबाला सतावत होती.
यातच जनाबाईंचा मुलगा शाहू धोंडू पाटील हा अत्यंत गंभीर अशा टी.बी. (क्षयरोग) या आजाराने ग्रस्त आहे. आजारपणामुळे त्यांच्याकडे उपचारासाठी पैसे नाहीत आणि राहायला सुरक्षित घरही नाही, अशा दुहेरी संकटात हे कुटुंब सापडले होते.
या कुटुंबाची ही बिकट परिस्थिती इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तातडीने या परिस्थितीची संपूर्ण माहिती भाजप युवा नेते विशाल परब यांच्यापर्यंत पोहोचवली. माहिती मिळताच विशाल परब यांनी क्षणाचाही विलंब न लावता या कुटुंबाला तात्काळ मदत देण्याचा निर्णय घेतला आणि घटनास्थळी धाव घेतली.
”पागावाडीतील या कुटुंबाची अवस्था पाहून मन सुन्न झाले. पावसाळ्यात एका वृद्ध माऊलीला आणि आजारी भावाला अशा परिस्थितीत सोडणे माणुसकीला धरून नाही. या कुटुंबाला सुरक्षित छत मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या उपचारासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करत आहोत आणि पुढेही कटिबद्ध राहू.” असे विशाल परब यांनी सांगितले.