श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचां जगद्गुरु बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान
अक्कलकोट,दि.२५ ऑक्टोंबर
एक नगरसेवक म्हणून आपल्या जनतेची सेवा करताना, दुसरीकडे जगद्वंद्य श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वटवृक्ष देवस्थानचा कारभार अत्यंत पारदर्शक, शिस्तबद्ध आणि भक्ताभिमुख पद्धतीने सांभाळणे, हे सोपे काम नाही. महेश मालक इंगळे यांनी वटवृक्ष देवस्थान संचलित भक्तनिवास, श्री स्वामी समर्थ रुग्णालय, कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन, विद्यार्थी वस्तीगृह, गोशाळा,
मंदीरातील वर्षभरातील सर्व धार्मिक उपक्रम आदी उपक्रमांसह वटवृक्ष मंदीरातील स्वामी दर्शन व्यवस्था यामध्ये आमूलाग्र सुधारणा करून लाखो स्वामी भक्तांचे मन जिंकले आहे. त्यांचे हे समर्पित कार्य पाहता महेश मालक इंगळे यांचे व्यक्तीमत्व म्हणजे भक्तसेवा आणि समाजसेवेचा अनोखा संगम असल्याचे भावोद्गार बीदर येथील प्रसिद्ध ज्ञान योगाश्रम मठाचे मठाधिपती प.पू.बसवलिंग महास्वामीजी यांनी काढले.
नुकतेच नागणसूर येथील श्री जगद्गुरु बसवलिंगेश्वर महासंस्थान, तुप्पीन मठ यांच्या वतीने दिला जाणारा यंदाचा मानाचा जगद्गुरु बसवलिंगरत्न पुरस्कार
तुप्पीन मठाचे डॉ.अभिनव बसवलिंग
महास्वामीजी यांच्या हस्ते येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश मालक इंगळे यांना देण्यात आला. यावेळी चेअरमन महेश मालक इंगळे यांच्या व्यक्तीमत्वास संबोधीत करताना बीदर येथील प्रसिद्ध ज्ञान योगाश्रम मठाचे मठाधिपती प.पू.बसवलिंग महास्वामीजी यांनी वरील भावोद्गार काढले.
चेअरमन महेश मालक इंगळे यांच्या व्यक्तीमत्वास संबोधीत करताना प.पू.बसवलिंग महास्वामीजी पुढे म्हणाले की महात्मा बसवण्णांनी ‘कायक वे कैलास’ अर्थात श्रम हीच पूजा हा संदेश दिला. महेश मालक इंगळे यांच्या कार्यात आम्हाला तोच बसव विचार दिसतो.
त्यांची नम्रता, सेवाभाव आणि धर्माबद्दल असलेली आस्था पाहता ‘जगद्गुरु बसवलिंगरत्न’ पुरस्कारास योग्य व्यक्तीला लाभल्याचा आनंद आहे. त्यांच्या कार्याला आमचे मनापासून आशीर्वाद. त्यांच्या हातून अशीच निरंतर सेवा घडत राहो असे मनोदय व्यक्त करुन महास्वामीजींनी महेश मालक इंगळे यांना पुढील वाटचालीसाठी शुभाशीर्वाद दिले. दरम्यान महेश मालक इंगळे यांना हा पुरस्कार मिळाल्याने अक्कलकोट नगरीत व स्वामी भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, संतोष पराणे, सचिन किरनळ्ळी, श्रीकांत झिपरे, श्रीशैल गवंडी, खाजप्पा झंपले, सुनिल पवार, अंकूश केत, डॉ.राजू मलंग, खाजप्पा झंपले, संतोष जमगे, बाळासाहेब एकबोटे, रमेश शिंदे सर, ज्ञानेश्वर भोसले, तुषार मोरे, स्वामीनाथ मुसळे, बसवराज करूटे आदींसह नागणसूर परिसरातील तसेच महाराष्ट्र – कर्नाटक सीमावर्ती भागातील नागरीक भाविक आदीसह विवीध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांसह अनेक मठाधिपती व संत-महंत यांचे दिव्य सानिध्य लाभले.
यंदाच्या उत्सवात विक्रमी गर्दी झाली. एक लाखाहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.पुरणपोळीच्या महाप्रसादासाठी तब्बल ९० क्विंटल तुपाचा वापर करण्यात आला. तब्बल २१ हजार सुवासिनींची ओटी भरण्यात आली, ४२ जोडप्यांचे सामूहिक विवाह पार पडले. आणि १२ हजार जंगम बांधवांची धार्मिक पद्धतीने आराधना करण्यात आली. नवीन भक्तनिवासाचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले.