बांदा : गव्यांनी दुसऱ्यांदा फस्त केली भातलावणी

शेअर करा

पाडलोस केणीवाडा येथील घटना : रानटी प्राण्यांच्या उपद्रवाने शेतकरी हतबल

बांदा,दि.२६ जुलै
एकीकडे अनियमित पावसामुळे शेती संकटात सापडली असताना, दुसरीकडे रानटी प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी अधिकच गंभीर बनल्या आहेत. पाडलोस केणीवाडा येथील शेतकरी राजन तुकाराम नाईक यांनी मोठ्या कष्टाने व खर्च करून केलेली भातलावणी गवा रेड्यांच्या कळपाने दुसऱ्यांदा फस्त केल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.


पाऊस दडी मारल्याने मोटर पंपाच्या साहाय्याने पाणी देत त्यांनी लावणी केली होती. महागडी खते, वाढलेली मजुरी, शेती मशागतीचा खर्च आणि स्वतःच्या अथक परिश्रमांनंतरही उभे पीक काही क्षणांत उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. गव्यांनी पुन्हा शेतात प्रवेश करून संपूर्ण लावणीची नासधूस केली. त्यामुळे केवळ आर्थिक नुकसानच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या मेहनतीवरही पाणी फिरले आहे. अशा घटना परिसरात वारंवार घडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.


शेतकऱ्याकडून पारंपरिक उपाययोजना
रानटी प्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी वनविभागाची वाट न पाहता राजन नाईक यांनी शेताभोवती साड्या बांधणे, बुजगावणे उभे करणे अशा पारंपरिक उपाययोजना केल्या आहेत. तरी देखील रानटी प्राणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. वनविभागाने ठोस पावले उचलत शेतीचे संरक्षण करावे अशी मागणी नाईक यांनी केली आहे.


शेतीचे संरक्षण करा : राजन नाईक
वन्यप्राण्यांचे संरक्षण जितके महत्त्वाचे आहे, तितकेच शेतकऱ्यांच्या श्रमांचे आणि उपजीविकेचे संरक्षणही आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना करून रानटी प्राण्यांचा बंदोबस्त करावा, शेतीचे संरक्षण करावे आणि झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी राजन नाईक यांनी केली आहे.

शेअर करा