सांस्कृतिक भवनासमोर शुक्रवारी रात्री घडली दुर्घटना; डोक्याला गंभीर दुखापत, पोलिसांकडून तपास सुरू
देवगड,दि.१० जुलै
देवगड-नांदगाव मार्गावरील जामसंडे येथील एका खासगी रुग्णालयासमोर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात जामसंडे येथील मिलिंद शामराव घाडी (वय ४५, मूळ रा. तळवडे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रस्त्यावर अचानक आलेल्या मोकाट गायीला त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसल्याने हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, मिलिंद घाडी हे देवगडमधील एका खासगी वाहनावर चालक म्हणून अनेक वर्षांपासून कार्यरत होते. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सायंकाळी काम आटोपून ते आपल्या टीव्हीएस ज्युपिटर (एमएच-०७-एक्यू-०३६५) या दुचाकीवरून जामसंडेकडे परतत होते. जामसंडे वडाचा परिसरातील एका खासगी रुग्णालयाजवळ पोहोचताच अचानक एक गाय रस्त्यावर आडवी आल्याने त्यांच्या दुचाकीची गायीला जोरदार धडक बसली.

धडकेनंतर मिलिंद घाडी हे दुचाकीवरून फेकले जाऊन रस्त्यावर आपटले. या अपघातात त्यांच्या डोक्यासह शरीराला गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना रुग्णवाहिकेतून देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती परिसरात पसरताच देवगड व जामसंडे येथील नागरिकांसह मित्रपरिवाराने ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली. अपघाताची माहिती समजताच तळवडे येथील त्यांच्या कुटुंबीयांनीही रुग्णालयात धाव घेतली. पतीच्या निधनाची बातमी समजताच पत्नीने रुग्णालयातच हंबरडा फोडल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले.
मिलिंद घाडी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील असा परिवार असून त्यांच्या अकाली निधनामुळे जामसंडे व तळवडे परिसरात शोककळा पसरली आहे.