पीडित महिलेला तातडीने संरक्षण द्या; दोषींवर कठोर कारवाईची तन्वी चांदोस्कर व प्रियांका साळस्कर यांची मागणी
देवगड,दि.१२ जुलै
माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात विरार पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष महिला आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणाची कोणत्याही राजकीय दबावाशिवाय निष्पक्ष व सखोल चौकशी करून पीडित महिलेला तातडीने संरक्षण द्यावे, अशी मागणी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली.
देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा सभापती तथा नगरसेविका तन्वी चांदोस्कर आणि भाजप महिला नेत्या प्रियांका साळस्कर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर भूमिका मांडली. यावेळी पंचायत समिती सदस्या स्नेहा अनुभवणे तसेच माजी नगरसेविका प्राजक्ता घाडी उपस्थित होत्या.
पत्रकार परिषदेत बोलताना तन्वी चांदोस्कर यांनी सांगितले की, विरार पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात मानसिक, शारीरिक, आर्थिक छळ, फसवणूक तसेच अंधश्रद्धेशी संबंधित गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणातील सत्य समोर आणण्यासाठी निष्पक्ष तपास होणे आवश्यक असून, तक्रारदार महिलेला तातडीने सुरक्षा देण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली.
यावेळी प्रियांका साळस्कर यांनीही तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देत, एखाद्या महिलेने इतके गंभीर आरोप केले असताना त्या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक असल्याचे सांगितले. दोषी कोणताही असो, त्याच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
महिलांवरील अन्यायाविरोधात भारतीय जनता पक्ष महिला आघाडी नेहमीच ठामपणे उभी राहील. पीडित महिलेला न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरू राहील, असा निर्धारही यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला