रस्त्यावर आलेल्या गाईला धडक देत अपघात घडल्याप्रकरणी हयगयीने वाहन चालवल्याचा ठपका; देवगड पोलिसांची कारवाई
देवगड,दि.११ जुलै
जामसंडे येथील अपघातप्रकरणी देवगड पोलिसांनी मोटरसायकल हयगयीने चालवून रस्त्याचा विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून रस्त्यावर आलेल्या गाईला जोरदार धडक देवून झालेल्या अपघातामध्ये स्वत:चा मृत्युस व वाहनाच्या नुकसानीस कारणीभूत झाला म्हणून अपघातामधील मयत मोटरसायकलस्वार मिलींद शामराव घाडी(47) मुळ रा.तळवडे घाडीवाडी याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.हा अपघात शुक्रवारी 10 जुलै रोजी सायंकाळी 7.15 वा.सुमारास झाला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मोटरसायकलस्वार मिलींद शामराव घाडी हा स्वत:चा ताब्यातील मोटरसायकल घेवून देवगड ते जामसंडे येथे जात असताना मोटरसायकल हयगयीने चालवून रस्त्याचा विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून जात असताना जामसंडे येथिल एका बीअर शॉपीसमोर रस्त्यावर आलेल्या गाईला जोरदार धडक दिली.यावेळी मोटरसायकलवरील ताबा सुटून तो रस्त्यावर पडल्याने त्याचा डोक्यास गंभीर दुखापत होवून मृत्यु झाला.स्वत:चा मृत्युस व वाहनाच्या नुकसानीस कारणीभुत ठरल्याप्रकरणी देवगड पोलिसांनी मिलींद घाडी याच्याविरूध्द भारतीय न्याय संहीता 106(1),281,125(ए),125(बी),324(2), मोटर वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.तपास स.पो.उपनिरिक्षक प्रवीण सावंत करीत आहेत.