”देवगडात मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना” व ईईझेड नियम-२०२५ जनजागृती कार्यक्रम संपन्न

शेअर करा

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे तळागाळातील नागरिकांपर्यंत योजना पोहोचविण्याचे निर्देश

देवगड, ५ ऑगस्ट

मत्स्यव्यवसाय विभाग, सिंधुदुर्ग यांच्यावतीने आज देवदुर्ग मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था, देवगड येथे मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना आणि ईईझेड नियम-२०२५ याबाबत जनजागृती कार्यक्रम तसेच प्रवेश परवाना (Access Pass) व उच्च समुद्र प्राधिकरण पत्र (High Sea Letter of Authorization) वितरण-मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या शिबिरात Fishery Survey of India (FSI), मुंबई येथील तज्ज्ञ आणि विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मच्छिमारांची Access Pass नोंदणी पूर्ण झाली.
कार्यक्रमाचा मुख्य उद्देश मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची जनजागृती, ईईझेड नियम-२०२५ ची माहिती, Access Pass आणि High Sea Letter of Authorization बाबत मार्गदर्शन, पात्र नौका मालकांना परवाने वितरित करणे तसेच TED (Turtle Excluder Device) बसविण्याचे महत्त्व अधोरेखित करणे हा होता.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय श्री. सागर कुवेसकर यांनी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेबाबत मच्छिमार बांधवांना मार्गदर्शन केले आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी श्री. प्रतीक महाडवाला यांनी ईईझेडबाबत सविस्तर ओळख करून दिली. देवगडचे अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी श्री. किरण वाघमारे यांनी सर्व मच्छिमारांनी ईईझेड Access Pass घेऊन मासेमारी व्यवसाय वृद्धिंगत करावा, असे आवाहन केले. परवाना अधिकारी कार्यालयात Access Pass निःशुल्क काढून देण्याची सोय उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.
फिशरी सर्व्हे ऑफ इंडियाचे (FSI) झोनल डायरेक्टर डॉ. विनोद कुमार यांनी Access Pass काढण्याची गरज, शाश्वत मासेमारी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताचे अव्वल स्थान निर्माण करून परकीय चलन वाढविण्याचे महत्त्व सांगितले. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार TED बसविणे का आवश्यक आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. डॉ. देवानंद उईके यांनी Access Pass नोंदणी प्रक्रिया सविस्तर सादर केली, तर श्री. अशोक कदम यांनी ईईझेड टूना मासेमारीबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे निवेदन FSI शास्त्रज्ञ श्री. स्वप्नील शिर्के यांनी केले.

तारामुंबरी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे अध्यक्ष विनायक प्रभू, देवगड संस्थेचे द्विजिकांत कोयंडे, देवदुर्ग मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे अध्यक्ष तुषार पारकर यांच्यासह सर्व संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य, नौका मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी यापूर्वी दिलेल्या निर्देशानुसार योजना तळागाळातील मच्छिमारांपर्यंत पोहोचविण्यासाठी विभागाने असे जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यावर भर दिला आहे.

शेअर करा