३० दिवसांत कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा; नगराध्यक्षांसह अधिकाऱ्यांशी नागरिकांची चर्चा
देवगड,दि.२१ जुलै
देवगड-जामसंडे शहरातील मोकाट गुरांच्या वाढत्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी पुन्हा एकदा पुढाकार घेत नगरपंचायत प्रशासनाला ‘स्मरणपत्र-१’ सादर केले. यावेळी नगराध्यक्ष, स्वच्छता व आरोग्य सभापती तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून कृती आराखड्याच्या अंमलबजावणीबाबत माहितीही जाणून घेतली.

शहरातील नागरिकांनी आठ दिवसांपूर्वी मोकाट गुरांच्या प्रश्नावर उपाययोजना करण्यासाठी ३० दिवसांचा कालबद्ध कृती आराखडा नगरपंचायत प्रशासनासमोर मांडला होता. या आराखड्यानुसार शहरातील मोकाट गुरांचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी करण्यात आली होती.
याच कृती आराखड्याच्या अनुषंगाने प्रशासनाकडून आतापर्यंत कोणती कार्यवाही करण्यात आली, याचा आढावा घेण्यासाठी नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयाला भेट दिली. यावेळी नगराध्यक्ष, स्वच्छता व आरोग्य सभापती तसेच संबंधित प्रशासकीय कर्मचाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच नागरिकांच्या मूळ मागण्यांची पूर्तता व्हावी, यासाठी ‘स्मरणपत्र-१’ सादर करण्यात आले.
यावेळी गुरुदेव परूळेकर, अण्णा खवळे, विजय कदम, सुधीर मांजरेकर, गिरीश धोपटे, आनंद देवगडकर, महेंद्र लांबोरे, कुंदन घाडी, चंद्रशेखर घाडी, शरद लाड, निलेश ढोके, स्वप्निल कुबल, ओंकार बांदकर, विरेंद्र कार्लेकर यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते.
नागरिकांनी शहरातील मोकाट गुरांचा प्रश्न तातडीने सोडवून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी प्रशासनाकडे केली.