संजय गांधी निराधार, श्रावणबाळ व इंदिरा गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना डीएलसी नोंदणीची संधी; तहसीलदार शीतल जाधव यांचे आवाहन
देवगड ,दि.०५ ऑगस्ट
देवगड तालुक्यातील मिठबाव, तळवडे आणि पडेल मंडळातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांतील लाभार्थ्यांसाठी बुधवार, ६ ऑगस्ट रोजी डिजिटल हयात दाखला (डीएलसी) नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय योजनांतील लाभार्थ्यांची डिजिटल हयात दाखला नोंदणी करण्यात येणार आहे. अद्याप ऑनलाइन हयात दाखला नोंदणी न केलेल्या लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शिबिरात उपस्थित राहून डीएलसी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन देवगड तहसीलदार शीतल जाधव यांनी केले आहे.
या उपक्रमामुळे लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ नियमितपणे मिळण्यास मदत होणार असून, वेळेत नोंदणी करण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे.