हनुमान युवक क्रीडा मंडळाच्या पुढाकाराने आयोजित शोकसभेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली
देवगड,,दि.२१ जुलै
देवगडच्या सामाजिक, राजकीय, पत्रकारिता आणि जैन समाजातील कार्यामुळे सर्वपरिचित असलेले ज्येष्ठ पत्रकार दयानंद मांगले यांच्या निधनाने एक व्यासंगी, आनंदी आणि निर्भीड व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना सर्वपक्षीय नागरिकांनी व्यक्त केली. त्यांच्या कार्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचा गौरव करत, हनुमान युवक क्रीडा मंडळाच्या वतीने मंगळवारी आयोजित शोकसभेत उपस्थित मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी माजी नगराध्यक्षा तन्वी चांदोस्कर, विलास रुमडे, प्रदीप सावंत, अण्णा खवळे, शिवराम निकम, राजेंद्र मुंबरकर, एकनाथ तेली, काका ढोके आदींनी आपल्या मनोगतात दयानंद मांगले यांच्या कार्याचा गौरव केला. महाविद्यालयीन जीवनापासून त्यांनी विविध सामाजिक आणि सार्वजनिक व्यासपीठांवर सक्रियपणे काम केले. भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून पक्षीय कार्य करत असतानाच त्यांनी निर्भीड आणि निःपक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले, असे वक्त्यांनी नमूद केले.
पत्रकार म्हणूनच नव्हे, तर सहकाऱ्यांना मार्गदर्शन करणारे, सर्वांना मदतीचा हात देणारे आणि जिव्हाळ्याचे व्यक्तिमत्त्व म्हणून दयानंद मांगले यांची ओळख होती. जैन समाजाचे कार्य महाराष्ट्रभर पोहोचविण्यातही त्यांचे उल्लेखनीय योगदान राहिले. विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा अनेकदा सत्कार व पुरस्कारांनी गौरव करण्यात आला होता. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
देवगड मधील पत्रकारितेतील ‘दया दार ‘उघड अशी ज्याला हक्काने हाक मारता येईल असा सर्वसामान्य जनतेतला दया मांगले म्हणून ज्यांची ओळख संपूर्ण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात होती ते आज आपल्यात नाहीत हीच बाब मनाला पटत नाही. गेले दशकात गणेश आचरेकर आणि दया मांगले ही पत्रकारितेतील यशस्वी जोडी अशी अलग होईल हे कोणीही मान्य करणार नाही. कोणताही समाज असो, राजकारण असो, धार्मिक, संस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम,शासकीय योजना प्रचार आणि प्रसार आपल्या परीने अग्रक्रमाने लोकांपर्यंत पोहविण्यात पूर्वीचे सिंधुदुर्ग 24 तास आत्ताचे सिंधुदुर्ग संवाद चे 100% टक्के योगदान कोणीही नाकारू शकत नाही. दया यांच्या जाण्याने पत्रकारितेतील एक तारा निखळला एवढं मात्र खरं. दया यांच्या प्रति भावपूर्ण श्रद्धांजली
प्रा. प्रदिप कदम यांनी व्यक्त केली
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर तसेच सुरेश सोनटक्के यांच्या शोकसंदेशाचे वाचन करण्यात आले.
शोकसभेला नगराध्यक्षा साक्षी प्रभू, संतोष तारी, विशाल मांजरेकर,उल्हास मणचेकर ,सुधीर मांजरेकर ,विजय कदम, गुरुनाथ वाडेकर, गिरीश धोपटे ,उषःकाला केळुस्कर, यावेळी पत्रकार रमाकांत डगरे ,राजीव पडवळ ,गणेश आचरेकर ,यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.